अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान तैनात करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांपैकी १५० पेक्षा अधिक सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. एका अमेरिकेच्या अधिकाऱ्यानं शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली. जो बायडेन यांचा शपथविधी सोहळा पार पडण्यापूर्वी ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीत हिंसाचार घडवला होता. त्यानंतर शपथविधीपूर्वी सुरक्षा अधिक कडक करण्यात आली होती. २० जानेवारी रोजी जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ते अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.व्हाईट हाऊसच्या बाहेर चेक पॉईंट्स तयार करण्यात आले होते. तसंच शहरात २५ हजारांपेक्षा अधित सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात आलं होतं. शहरात तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांपैकी अनेक सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. ही संख्या वाढूही शकते, अशी माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना दिली. सुरक्षारक्षकांच्या तैनातीपूर्वी त्यांचं स्क्रिनिंग करण्यात आलं होतं. तसंच शरीराचं तापमानही पाहण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त लष्कराच्या माहितीनुसार हजारो सैनिकाच्या घरी परतण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या पाच दहा दिवसांमध्ये १५ हजार सुरक्षारक्षकांना त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.गेल्या गुरूवारी सलग दुसऱ्या दिवशी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत ४ हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली होती. रॉयटर्सच्या पब्लिक हेल्थ डेटानुसार अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे ४ लाख १० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त कोरोना संक्रमित सुरक्षारक्षकांबद्दल कोणतीही चर्चा केली जाणार नसल्याचं नॅशनल गार्ड्सकडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात सांगण्यात आलं.गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी आपल्या कोरोनाविषय धोरणांमध्ये मोठे बदल केले आहेत.पुढील १०० दिवस सर्वांनी मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं असून सुरक्षेबाबतही काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान तैनात केलेल्या सुरक्षारक्षकांपैकी १५० जण कोरोना पॉझिटिव्ह
By जयदीप दाभोळकर | Published: January 23, 2021 8:48 AM
ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली होती.
ठळक मुद्देट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली होती.२० जानेवारी रोजी बायडेन यांनी घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ