इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी न्यायाधीश सिकंदर हयात यांच्या नावे तब्बल 2200 कारची नोंदणी असल्याची माहिती समोर आल्याने पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हयात यांच्या वकिलांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, सिकंदर हयात यांनी आतापर्यंत केवळ एकाच कारची खरेदी केली आहे.
पाकिस्तानचे प्रमुख वृत्तपत्र डॉनने याबाबचे वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार, माजी न्यायाधीश हयात यांच्या नावावर 2200 कारची नोंदणी आहे. हयात यांचे वकील मियां जफर यांनी हयात यांच्या नावावर 2224 कारची नोंदणी आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांना एक पावती पाठवण्यात आली होती. मात्र ती कार त्यांनी खरेदी केली नसल्याची माहिती वकिलांनी न्यायालयात दिली.
पंजाब एक्साइज अँड टॅक्सेशन डिपार्टमेंटने याबाबतची माहिती दिल्यानंतर ही बाब समोर आली आहे. यामध्ये सिकंदर हयात हे 2,224 वाहनांचे नोंदणीकृत मालक असल्याचं समजलं. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी पंजाब एक्साइज अँड टॅक्सेशन डिपार्टमेंटचे सचिव आणि संचालकांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच न्यायालयाने एका आठवड्याच्या आत अहवाल मागितला आहे.