बामाको, माली: मध्य मालीमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अल-कायदाशी संबंधित ५० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती फ्रान्स सरकारनं दिली आहे. बुर्किना फासो आणि नायगरमधील सीमावर्ती भागात फ्रान्सच्या सैन्यानं कारवाई केल्याचं फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी सांगितलं. या भागात इस्लामिक बंडखोरांचं वर्चस्व आहे.'मालेमध्ये ३० ऑक्टोबरला करण्यात आलेल्या कारवाईत ५० हून अधिक जिहादी मारले गेले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला,' अशी माहिती पार्ली यांनी दिली. ड्रोननं ३० हून अधिक दुचाकीस्वारांचा ताफ्याचे फोटो टिपल्यानंतर एअर स्ट्राईक करण्यात आल्याचं पार्ली यांनी सांगितलं. पार्ली यांनी काही दिवसांपूर्वीच नायजेरियाचे अध्यक्ष मोहमदोऊ इस्सोऊफोऊ आणि संरक्षणमंत्री इस्सोऊफोऊ कातांबे यांची भेट घेतली होती.जिहादी दुचाकीवरून प्रवास करताना त्यांच्यावर दोन मिराज विमानांनी हल्ला केला. त्यावेळी दहशतवाद्यांनी झाडांखाली लपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विमानांनी क्षेपणास्त्रं डागली. त्यात दहशतवादी ठार झाले, अशी माहिती पार्ली यांनी सांगितलं. या हल्ल्यानंतर चार दहशतवादी जिवंत पकडले गेल्याची माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल फ्रेडेरिक बार्ब्रे यांनी दिली. दहशतवाद्यांजवळ मोठ्या प्रमाणात स्फोटकं आढळून आली. ते या भागातील लष्करी भागांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती बार्ब्रे यांनी पत्रकारांना कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून दिली.सहारा भागात इस्लामिक स्टेटविरोधात कारवाया सुरू असल्याचंही बार्ब्रे यांनी सांगितलं. ग्रेटर सहारामध्ये सुरू असलेल्या कारवाईत ३ हजार सैनिकांचा समावेश आहे. महिन्याभरापासून सहारामध्ये कारवाई सुरू आहे. त्या कारवाईची माहितीदेखील लवकरच दिली जाईल, असंदेखील ते पुढे म्हणाले.
फ्रान्सच्या एअरस्ट्राईकमध्ये अल-कायदाशी संबंधित ५० हून अधिक दहशतवादी ठार
By कुणाल गवाणकर | Published: November 03, 2020 11:18 AM