भारतात यंदा उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर सौदी अरेबियातही उष्णतेचा कहर आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कडक उन्हामुळे हजदरम्यान जवळपास ५५० यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांपैकी किमान ३२३ इजिप्तचे नागरिक होते, त्यापैकी बहुतेकांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला. इजिप्तमधील ३२३ हज यात्रेकरूंपैकी एक वगळता सर्वांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला आहे. गर्दीत एक हज यात्रेकरू जखमी झाला.
मक्काजवळील अल-मुआइसम येथील रुग्णालयाच्या शवागारातून ही आकडेवारी समोर आली आहे. कमीतकमी जॉर्डनच्या ६० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी अम्मानने अधिकृतपणे ४१ मृत्यूची नोंद केली. एएफपीच्या रिपोर्टनुसार, ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत अनेक देशांनी नोंदवलेल्या एकूण मृत्यूंची संख्या ५७७ वर पोहोचली आहे. मक्कातील सर्वात मोठ्या शवगृहांपैकी एक असलेल्या अल-मुआइसममध्ये एकूण ५५० मृतदेह आहेत.
गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या सौदीच्या रिसर्चनुसार, हवामान बदलामुळे हज यात्रेवर परिणाम होत आहे. रिसर्चमध्ये असंही म्हटलं आहे की, काही भागातील तापमान दर दशकात ०.४ डिग्री सेल्सिअस (०.७२ डिग्री फॅरेनहाइट) वाढतं आहे. सौदी नॅशनल मेटिऑलॉजिकल सेंटरने सांगितलं की, मक्काच्या ग्रँड मशिदीचं तापमान सोमवारी ५१.८ डिग्री सेल्सिअस (१२५ फॅरेनहाइट) वर पोहोचलं.
हज यात्रेकरूंना उष्णतेचा फटका
मंगळवारी, इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं की, हजदरम्यान बेपत्ता झालेल्या इजिप्शियन नागरिकांचा शोध घेण्यासाठी सौदी अधिकाऱ्यांसोबत काम करत आहे. मंत्रालयाच्या निवेदनात मृत्यूंची ठराविक संख्या असल्याचं म्हटलं असलं तरी, त्यात इजिप्शियन लोकांचा समावेश आहे की नाही हे स्पष्ट केलेलं नाही. सौदी अधिकाऱ्यांनी उष्माघाताने ग्रस्त २००० हून अधिक यात्रेकरूंवर उपचार केल्याचा अहवाल दिला, परंतु रविवारपासून हा आकडा अपडेट केलेला नाही आणि मृत्यूची माहितीही दिली नाही.
गेल्या वर्षीही २०० हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू
गेल्या वर्षी, विविध देशांनी किमान २४० यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची नोंद केली, त्यापैकी बहुतेक इंडोनेशियन नागरिक होते. सोमवारी मक्काच्या बाहेर मीना येथे एएफपी पत्रकारांनी यात्रेकरूंना आपल्या डोक्यावर पाण्याच्या बाटल्या ओतताना पाहिलं, तर स्वयंसेवकांनी त्यांना थंड ठेवण्यासाठी थंड पेय आणि चॉकलेट आइस्क्रीम दिले. सौदी अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंना छत्री वापरण्याचा सल्ला दिला आहे, भरपूर पाणी प्यावं आणि उन्हात जाणं टाळा असा सल्ला दिला.