गाझा पट्टीवर इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्रायली लष्कर हमासच्या ठाण्यांवर सातत्याने हल्ले करत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, याच दरम्यान, हमासच्या सशस्त्र शाखेने सांगितले की, गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे 60 हून अधिक ओलीस बेपत्ता आहेत. गेल्या महिन्याच्या अखेरीस, हमासने सांगितले की गाझावरील इस्रायली हल्ल्यात 50 लोक मारले गेले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासचा अंत केल्यानंतरच आपण शांत बसू असं म्हटलं आहे.
इज़ अल-दिन अल-कसम ब्रिगेडचे प्रवक्ते अबू उबेदा यांनी हमासच्या टेलीग्राम अकाऊंटवर सांगितलं की, बेपत्ता झालेल्या 60 इस्रायली ओलीसांपैकी 23 मृतदेह ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. गाझा विरुद्ध सुरू असलेल्या सततच्या क्रूर आक्रमणामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही असं वाटत असल्याचं म्हटलं आहे. रॉयटर्सने या प्रकरणातील विधानाची पुष्टी केली नाही. त्याच वेळी, इस्रायली सैन्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अनेकवेळा सांगितलं आहे की, त्यांच्यासाठी पहिली प्राथमिकता ओलीस ठेवलेल्यांची सुटका करणं हे आहे. यासाठी ते इजिप्तसारख्या देशांमार्फत हमासशीही बोलत आहे. त्याच वेळी, अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितलं की, पॅलेस्टिनी गटाने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर हमासने ओलीस ठेवलेल्यांच्या शोधात अमेरिका गाझावर पाळत ठेवणारे ड्रोन उडवत आहे.
7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर 5000 हून अधिक रॉकेटने हल्ला केला होता. यानंतर हमास इस्रायलच्या हद्दीत घुसला. त्यांनी नागरिकांवर गोळीबार केला आणि गाझा पट्टीमध्ये 200 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले. इस्रायलशिवाय या ओलिसांमध्ये अमेरिका आणि इतर देशांतील लोकांचाही समावेश आहे.