संयुक्त राष्ट्रे- गेल्या वर्षी सुमारे 7 हजार भारतीयांनी अमेरिकेकडे आश्रय मागितल्याची माहिती संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या अहवालात दिली आहे. अमेरिकेकडे इतर देशांच्या तुलनेत या वर्षी सर्वात जास्त लोकांनी आश्रय मागितल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.2017 वर्ष संपेपर्यंत 68.5 दशलक्ष लोकांना आपले घर सोडावे लागले होते. त्यातील 2017 या एका वर्षात निवासस्थान सोडाव्या लागणाऱ्या लोकांची संख्या 16.2 दशलक्ष इतकी होती. प्रतिदिन 44 हजार 500 लोकांना विस्थापित व्हावे लागल्यामूळे जगाच्या आजवरच्या इतिहासात या वर्षाला एक विस्थापित वर्ष म्हणूनच ओळखले गेले पाहिजे.
युद्ध, यादवी युद्धे, हिंसा, बळजबरीने घरे सोडावी लागणे अशा विविध कारणांमुळे गेल्या पाच वर्षांमध्ये आफ्रिकन, आशियाई देशांमध्ये लोकांना विस्थापन करावे लागले आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, दक्षिण सुदान, म्यानमार येथून लोकांनी विस्थापन केलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. सीरियामधील यादवीला कंटाळून व जीव वाचविण्यासाठी या पाच वर्षांमध्ये लक्षावधी लोकांनी युरोपची वाट धरली होती.अमेरिकेकडे साल्वाडोर देशाच्या 49 हजार 500 लोकांनी आश्रय मागितला. त्यापुर्वीच्या वर्षी 33,600 साल्वाडोर नागरिकांनी आश्रय मागितला होता. व्हेनेझुएलामधील भोंगळ कारभाराला कंटाळून 29,900 लोकांनी अमेरिकेकडे आश्रय मागितला आहे. मेक्सिकोतील 26,100, चीनमधील 17,400, हैतीच्या 8,600, भारताच्या 7,400 नागरिकांनी अमेरिकेकडे आश्रय मागितला. जगातील 168 देशांनी अमेरिकेकडे आश्रय मागितल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतामध्ये सध्या 1 लाख 97 हजार 149 विस्थापित असून 10,519 लोकांनी भारताकडे आश्रय मागितला आहे, त्याबाबत निर्णय झालेला नाही.यावर्षभरात म्यानमारमधून 9 लाख 32 हजार लोकांनी बांगलादेशात स्थलांतर केले तर थायलंडमध्ये 1 लाख म्यानमारचे नागरिक राहात आहेत. मलेशियात 98 हजार तर भारतात 18, 100 इतके म्यानमारमधून आलेले विस्थापित आहेत.