जेलिस्को : जगातील एकेकाळचा सर्वाधिक वजनदार इसम असलेल्या मेक्सिकोतील जुआन पेड्रो फ्रँको (३६ वर्षे) याने कोरोना आजारावर यशस्वीरीत्या मात केली आहे.
जुआनचे काही वर्षांपूर्वी ५९५ किलो (१,३१० पौंड) वजन होते. त्यामुळे त्याला २०१७ साली जगातील सर्वात वजनदार इसम म्हणून घोषित करण्यात आले होते. या विक्रमाची गिनीज बुकामध्ये नोंद करण्यात आली होती; पण त्यानंतर जुआनवर करण्यात आलेली एक शस्त्रक्रिया, तसेच त्याने केलेला व्यायाम, डाएटिंग यामुळे त्याचे वजन कमी होऊन ते २०८ किलो झाले आहे. त्यामुळेच कोरोना आजारावर आपण मात करू शकलो, असे जुआन पेड्रो फ्रँको याने सांगितले.
त्याला उच्च रक्तदाब, मधुमेह, फुफ्फुसविकार आहे. अशा व्यक्तींसाठी कोरोना संसर्ग जीवघेणा ठरू शकतो. मात्र, त्यातून तो पूर्णपणे बरा झाला. जुआनने सांगितले, कोरोना अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार आहे.