लोकमत न्यूज नेटवर्कजगाच्या पाठीवर असे फार थोडे भूभाग, प्रांत आहेत, जिथे कोरोनानं अद्याप आपले पाय पसरलेले नाहीत. अर्थात असं म्हणणंही धाडसाचं ठरेल. कारण अनेक भागात अद्याप कोरोनाच्या चाचण्याही झालेल्या नाहीत. त्यामुळेच तिथे कोरोनाचे रुग्ण सापडलेले नाहीत. जंगलात, सामान्य माणसांपासून दूर राहणार्या जमातींमध्येही कोरोना आढळणार नाही, असं म्हटलं जात होतं. पण त्यांच्यामध्येही कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याचं लक्षात आलं आहे. उलट अशा व्यक्ती कोरोनाच्या लवकर शिकार होतील, असं तज्ञांचं म्हणणं आहे. कारण त्यांच्या शरीरात अशा विशाणूंशी लढण्यासाठी प्रतिकारशक्तीच तयार झालेली नाही.अमेरिकेत सध्या कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पण अमेरिकेतलं एक बेट असं आहे, जिथे अजून कोरोनानं शिरकाव केलेला नाही. या बेटाचं नाव आहे ‘पॉइंट रॉबर्ट्स’! या भागाचं आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा भाग अमेरिकेत असला, तर तिथे पोहोचण्याचा मार्ग मात्र कॅनडातून आहे. रस्ते मार्गानं कॅनडातून इथे येता येऊ शकतं. मात्र कोरोनाचा प्रसार व्हायला सुरुवात झाल्याबरोबर कॅनडानं हा मार्गही बंद करून टाकला आहे. त्यामुळे अमेरिकेतला हा भूभाग आता संपूर्ण जगासाठी बंद आहे. मात्र त्याचमुळे कोरोनाच्या संसर्गापासून तो अमेरिकेतला सर्वात सुरक्षित भाग मानला जातो. पाच चौरस किलोमीटरच्या या बेटावर केवळ 1300 नागरिक राहतात. या ठिकाणी जायचं तर दोन आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडाव्या लागतात. तिथल्या लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सध्या कॅनडियन नागरिकांकडून केली जात आहे.
मालकी अमेरिकेची, रस्ता कॅनडातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 1:17 PM
अमेरिकेतलं एक बेट असं आहे, जिथे अजून कोरोनानं शिरकाव केलेला नाही. या बेटाचं नाव आहे ‘पॉइंट रॉबर्ट्स’!
ठळक मुद्दे ‘पॉइंट रॉबर्ट्स’ या भागाचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हा भाग अमेरिकेत असला, तर तिथे पोहोचण्याचा मार्ग मात्र कॅनडातून आहे.