इस्लामाबादपाकिस्तानची सरकारी विमान कंपनी असलेल्या 'पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स'चं भाडेतत्वावर घेण्यात आलेलं विमान जप्त करण्यात आलं होतं. मलेशियात ही कारवाई करण्यात आली होती.
महत्वाची बाब म्हणजे, पाकिस्ताननं ज्या कंपनीकडून हे प्रवासी विमान भाडेतत्वावर घेतलं होतं त्या कंपनीचे मालक भारतीय वंशाचे असल्याची माहिती प्रसार माध्यमांनी दिली आहे. क्वालालंपूर विमानतळावर जेव्हा हे विमान जप्त करण्यात आलं होतं त्यावेळी या विमानात प्रवासी आणि पायलट देखील होते.
विमानाचे मालक आणि संचालक भारतीयमलेशियात पाकचे विमान जप्त करण्यात आल्यानंतर पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानने ज्या कंपनीकडून हे बोईंग ७७७ विमान भाडेतत्वावर घेतलं होतं त्या कंपनीचे मालक आणि संचालक भारतीय आहेत. विमानाचं भाडं न दिल्यामुळे ते जप्त करण्यात आलं आहे. या कंपनीचं कार्यालय दुबई येथे असून त्यात भारतीय वंशाचेच कर्मचारी काम करतात. दरम्यान, पाकिस्तान एअरलाइन्स याआधीही अनेकदा टीकेच्या केंद्रस्थानी होती.
विमान प्रवासात सुरक्षेत निष्काळजीपणागेल्या वर्षी कराची विमानतळाजवळ झालेल्या विमान दुर्घटनेनंतर पाकिस्तानी हवाई वाहतूक सेवेत असलेल्या सुरक्षेच्या त्रृटी समोर आल्या होत्या. इतकंच नव्हे, तर देशाचे नागरी उड्डाण मंत्री सरवर खान यांनी पाकिस्तानच्या हवाई वाहतूक सेवेत काम करत असणाऱ्या पायलटपैकी ४० टक्के पायलट हे बनावट असल्याचा आरोप केला होता. इमरान खान यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी तर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा तस्करीच्या आरोपाखाली अटक केल्याचंही म्हटलं होतं.
याआधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानचा या विमान दुर्घटनेमुळे पाय आणखी खोलात गेला होता. युरोपियन युनियनने पाकिस्तान एअरलाइन्सच्या विमानांना प्रवेश बंदी जाहीर केली होती. तर जवळपास १८८ पाकिस्तानी पायलटवर कायमस्वरुपी बंदीचं संकट ओढावलं होतं.