इस्लामाबाद : अमेरिकेने दहशतवादविरोधी मोहिमांना वेग देण्यासाठी पाकिस्तानला एएच-१झेड वायपर लढाऊ हेलिकॉप्टर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.डॉन या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकी संरक्षण विभागाने पाकला हेलिकॉप्टर्स उपलब्ध करून देण्यासाठी बेल हेलिकॉप्टरला ५.८ कोटी डॉलरचे कंत्राट दिले आहे. पाकने एप्रिलमध्ये १५ एएच-१ झेड हेलिकॉप्टर्सचा पुरवठा करण्याची मागणी केली होती; मात्र त्याला किती हेलिकॉप्टर दिले जातील हे स्पष्ट नाही. यापैकी काही हेलिकॉप्टर्स डिसेंबर २०१८ पर्यंत त्याला दिले जातील, असे डॉनच्या वृत्तात म्हटले आहे. अमेरिकी संरक्षण विभागाच्या एका अधिसूचनेत म्हटले आहे की, बेल हेिलकॉप्टरला ५८.१ कोटी डॉलरचे कंत्राट देण्यात आले असून त्यातील दहा टक्के हिस्सा पाकिस्तानला विकण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरचा आहे. पाकने १,००० एजीएम-११४ हेलफायर २ क्षेपणास्त्रे देण्याचीही विनंती केली होती. एएच-१ झेड हेलिकॉप्टर आणि हेलफायर क्षेपणास्त्रे यामुळे डोंगराळ भागात कोणत्याही हवामानात मोहीम राबविण्याची पाकची क्षमता बळकट होईल. (वृत्तसंस्था)
पाकला अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स मिळणार
By admin | Published: August 30, 2015 12:52 AM