नवी दिल्ली - भारतानंतर आता पाकिस्तानात संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला विरोध होऊ लागला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच सेन्सॉर बोर्डाकडून 'पद्मावत' सिनेमाच्या रिलीजसाठी हिरवा कंदील मिळाला होता. यानंत देशभरात बॉक्सऑफिसवर सिनेमा झळकला. मात्र, सिनेमामध्ये मुस्लिमांचं चुकीची प्रतिमा दाखवण्यात आल्याचा आक्षेप घेत सिनेमावर बंदी आणावी यासाठी लाहौर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यानंतर पाकिस्तानातील सेन्सॉर बोर्डानं आणखी एकदा सिनेमाचे परीक्षण करण्यास सांगितले.
यानुसार, पंजाब सेन्सॉर बोर्ड 'पद्मावत' सिनेमाचं पुन्हा एकदा परीक्षण केले. यासाठी संपूर्ण बोर्डाची बैठक बोलावण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, पंजाब सेन्सॉर बोर्डकडून अद्यापपर्यंत लेखी स्वरुपात अधिकृतरित्या यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. मात्र बोर्डातील सदस्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आल्यानंतर हे प्रकरण समोर आले. यानंतर सिनेमातील दृश्य आणि संवादांचं परीक्षण केल्यानंतर 'पद्मावत'वर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतातही 'पद्मावत'ला झाला होता तीव्र विरोधइतिहासात छेडछाड झाल्याचा आरोप करत राजपूत करणी सेनेनं 'पद्मावत' सिनेमाविरोधात हिंसक आंदोलनं केली होती. राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिलजी यांच्यामध्ये ड्रीम सीक्वेन्स दाखवण्यात आल्याचा आरोप करणी सेनेकडून करण्यात आला होता. राजपूत करणी सेनेच्या सदस्यांनी संजय लीला भन्साळी आणि दीपिका पादुकोणला जीवेमारण्याची धमकी दिली होती. मात्र सिनेमामध्ये कोणतीही आक्षेपार्ह दृश्य चित्रित करण्यात आले नव्हते. दरम्यान, पद्मावतमध्ये राजपूतांची शौर्यगाथा दाखवण्यात आल्याचं सांगत, यापुढे सिनेमाला विरोध करणार नाही, असे करणी सेनेनं स्पष्ट केले होते. काही दिवसांपूर्वीच करणी सेनेनं सिनेमागृहात पद्मावत पाहिल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली होती.
पद्मावतनं तोडला 'टायगर जिंदा है'चा रेकॉर्ड 'पद्मावत'नं बॉक्सऑफिसवर शानदार कमाई केली आहे. आतापर्यंत सिनेमानं भारतात 225.50 कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. सिनेमामध्ये दीपिका पादुकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.