लंडन - 'पद्मावती' चित्रपट वादाच्या भोव-यात सापडल्यामुळे भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. पण इंग्लंडमध्ये हा चित्रपट येत्या 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. ब्रिटीश सेन्सॉर बोर्डाने 'पद्मावती' चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे युकेमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. पद्मावती चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड केल्याचा तसेच राजपूत समाजाची चुकीची बाजू दाखवल्याचा आरोप दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यावर करण्यात येत आहे.
करणी सेनेची देशभरात या चित्रपटाविरोधात आंदोलन सुरु आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये पद्मावतीच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावणा-या अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांना धमक्या दिल्या जात आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. दीपिकाच्या बंगळुरुमधील घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पद्मावती चित्रपटात दीपिकाने मुख्य भूमिका निभावली असून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे.
'जे सी नगर परिसरात जिथे दीपिकाचे आई-वडिल राहतात तिथे दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत', अशी माहिती पोलीस निरीक्षक गिरीश नाईक यांनी दिली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि संजय लिला भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला 10 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. याचवेळी त्यांनी चित्रपटात अल्लाऊद्दीन खिलजीची भूमिका करणा-या रणवीर सिंगचे पाय तोडण्याचीही धमकी दिली आहे. 'आम्हाला कायदा घातात घ्यायचा नाहीये. पण जर कोणी आमच्या बहिणी आणि मुलींकडे नजर उचलून पाहिलं तर त्याला शिक्षा करण्यात येणार', असं सूरजपाल अम्मू बोलले आहेत.