What is a pager bomb : संपर्कासाठी वापरल्या जाणाऱ्या हजारो पेजरचा एकापाठोपाठ स्फोट झाला आणि अवघे जग हादरले. पेजर स्फोटात हजारो लोक जखमी झाले, तर काहींचा मृत्यू झाला. लेबनान आणि सीरियाच्या सीमावर्ती भागात पेजर स्फोट घडवून आणण्यात आले. यामागे इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसाद असल्याचे म्हटले जात आहे. मोसादने हजारो पेजरमध्ये छेडछाड करत त्यात स्फोटके ठेवली. नेमके हे कसे गेले आणि त्यासाठी वापरण्यात आलेले PETN काय आहे?
पेजरमध्ये ठेवलेले बॉम्ब कसे बनवतात?
पेजरमध्ये ठेवण्यात आलेल्या स्फोटक पदार्थाचे नाव आहे PETN म्हणजेच Pentaerythritol tetranitrate. हा एक रासायनिक पदार्थ आहे. Pentaerythritol tetranitrate आणि प्लास्टिसायजर एकत्र करण्यात आल्यानंतर प्लास्टिक स्फोटक बनते. प्लास्टिक बॉम्बमध्ये याला सर्वाधिक शक्तिशाली आणि धोकादायक समजले जाते.
जर्मनीच्या लष्कराने लावला होता शोध
या बॉम्बचे वैशिष्ट्ये म्हणजे हे शोधणे म्हणजे मशीनच्या साहाय्याने डिटेक्ट करणे कठीण असते. सेंसरही या बॉम्ब शोधण्यासाठी काम करू शकत नाही. अमोनियम नाइट्रेट आणि पोटॅशियम नाइट्रेट या पदार्थांसोबत याचा वापर केला जातो. त्यामुळे ते जास्त हानिकारक बनते. या पदार्थाचा शोध जर्मनीच्या लष्कराने पहिल्या महायुद्धावेळी लावला होता.
कसे घडवून आणले पेजर बॉम्बस्फोट?
स्काय न्यूज अरबियाने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादने हिजबुल्लाहच्या पेजरमध्ये PETN बसवले होते. PETN हा पदार्थ पेजरच्या बॅटरीज वरती लावण्यात आला होता. पेजरच्या बॅटरीचे तापमान वाढवून स्फोट घडवण्यात आले. पेजरमध्ये ठेवण्यात आलेल्या स्फोटक पदार्थाचे वजन २० ग्रॅमपेक्षाही कमी होते.
तैवानमधील कंपनीचे होते पेजर
अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या पेजरचे स्फोट झाले, ते तैवानमधील कंपनीचे AP924 या मॉडेलचे होते. तैवानवरून जे पेजर लेबनानमध्ये पाठवण्यात आले, त्यावेळीच त्यांच्या बॅटरीजवर हे स्फोटक लावण्यात आलेली होती. दुपारी ३.३० वाजता लेबनानमधील या पेजरवरती एक मेसेज आला. त्यानंतर स्फोटके अॅक्टिव्ह झाली होती.