लंडन : एका ब्रिटिश दाम्पत्याने १.३२ कोटी रुपये (१.३४ लाख पौंड) इतकी प्रचंड रक्कम खर्च करून त्यांच्या पाळीव कुत्र्याचे क्लोन बनवून घेतले आहे. या कुत्र्यावर असलेल्या मायेपोटी त्यांनी हे अभूतपूर्व पाऊल उचलले आहे.लॉरा जॅक्स आणि रिचर्ड रीम्ड असे या दाम्पत्याचे नाव आहे. गेल्या जूनमध्ये त्यांच्याकडे असलेल्या बॉक्सर वंशाच्या ‘डायलन’ या कुत्र्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांनी त्याचे क्लोन बनविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी दक्षिण कोरियातील सुआम या बायोटेक कंपनीची मदत मागितली. या कंपनीने मृत कुत्र्याचे क्लोन तयार करण्यासाठी ६७ हजार पौंड घेतले. कंपनीने दोन क्लोन तयार केले. आता या ब्रिटिश दाम्पत्याला दोन नवजात पिल्ले मिळणार आहेत.लॉराचा हवाला देऊन ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. लॉरा म्हणाली की, ‘डायलन’चे क्लोन तयार करताना शास्त्रज्ञांनी त्याचे डीएनए डोनर एगमध्ये ठेवले. ते एका मादीत प्रत्यारोपित करण्यात आले. डायलन मरण पावल्यानंतर १२ दिवसांनी त्याच्या त्वचेचे नमुने कंपनीला दिले होते. डायलनचे शव या दाम्पत्याने फ्रिजरमध्ये ठेवले होते. एका माहितीपटाद्वारे लॉरा जॅक्सला क्लोनिंगची माहिती कळाली होती. तसे क्लोन करणारी कंपनी दक्षिण कोरियात असल्याची माहिती मिळताच तिने कंपनीशी संपर्क साधला आणि डायलनच्या त्वचेचे नमुने कंपनीकडे पाठविले. क्लोन तयार करणाऱ्या ‘सुआम’ या कंपनीतील एक शास्त्रज्ञ डेव्हिड किम म्हणाले की, क्लोन करण्यात आलेल्या कुत्र्याच्या दोन पिलांचा जन्म आमच्यासाठी अभूतपूर्व आहे.
दाम्पत्याने बनविला १.३ कोटीत पाळीव कुत्र्याचा क्लोन
By admin | Published: December 27, 2015 1:28 AM