इस्लामाबाद - टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धूने इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी आज शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना मिठी मारली. या 'जादू की झप्पी'मुळे भारत आणि पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तर राहुल गांधींच्या मोदी-मिठीनंतर आता सिद्धूंच्या बाजवा-मिठीवरुन राजकारण तापले आहे.
इम्रान खान हे पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते. आपल्या क्रिकेट करिअरमधून निवृत्ती घेतल्यानंतर इम्रान यांनी तहरीक ए इंसाफ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. आज या पक्षाने पाकिस्तान संसदेत बहुमताचा आकडा गाठल्यानंतर इम्रान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. क्रिकेटर म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर एखाद्या देशाचे प्रंतप्रधान होण्याचा पहिला मान इम्रान यांना मिळाला आहे. त्यामुळेच भारतीय क्रिकेट संघातील काही माजी क्रिकेटपटूंनाही इम्रान यांनी शपथविधी सोहळ्याला बोलावले होते. त्यास, नवज्योतसिंग सिद्धू यांनी हजेरी लावली. पाक राजकारणी म्हणून नव्हे, तर मित्र म्हणून आलोय, असे सिद्धू यांनी पाकिस्तानमध्ये मीडियाशी बोलताना स्पष्ट केलं. मात्र, सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची घेतलेली गळाभेट सर्वांचे आकर्षण ठरली.
सिद्धूचा 'मास्टरस्ट्रोक'; इम्रान खान यांच्यासाठी नेली खास काश्मीरची भेट
सिद्धूंच्या या गळाभेटीवरुन भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि सिद्धू यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली आहे. विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्यात सिद्धू यांना पाकव्याप्त काश्मीरचे राष्ट्रपती मसूद खान यांच्याशेजारीच बसविण्यात आले होते. त्यामुळे, एकीकडे सीमारेषेवर जवान शहीद होत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस नेते सिद्धू पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाची गळाभेट घेत आहेत, असे म्हणत सिद्धू यांना टार्गेटही करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे.दरम्यान, काश्मीरसाठी आतुर असलेल्या मित्रासाठी खास काश्मिरी शाल भेट नेण्याच्या सिद्धू यांच्या खेळीला त्यांच्या चाहत्यांनी 'छा गए गुरू' अशी दाद देत सिद्धूच्या षटकाराला फुल्ल प्रतिसाद दिला. कारण, काश्मीर आमचं आहे, ही आमच्या देशातील भेट आहे, असा सूचक संदेशही सिद्धू यांनी पाकिस्तान भेटीतून दिल्याचं बोललं जातंय.
पाहा व्हिडिओ -