लंडन - काश्मीर मुद्द्यावरून भारताविरोधात खोटे दावे करणाऱ्या पाकिस्तानला प्रत्येक वेळी तोंडघशी पडावं लागत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानच्या पदरी निराशा पडली आहे. तरीही पाकची खुमखुमी काही जात नाही. मंगळवारी लंडन येथे भारताविरोधात पाकिस्तानच्या समर्थकांनी आंदोलन केलं. यात भारताविरोधात भडकविण्यासाठी पाकचे 4 नेते आंदोलनस्थळी पोहचले. मात्र तेथे असणाऱ्या आंदोलनकर्त्यांनीच या नेत्यांवर अंडी आणि बूट फेकून हल्ला चढविला. आपल्या फायद्यासाठी हे नेते आमचा वापर करत आहेत असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
मंगळवारी यासीन मलिक यांच्या जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटने काश्मीर फ्रीडम मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात जवळपास 10 हजार काश्मिरी, ब्रिटिश पाकिस्तानी आणि खलिस्तानचे समर्थक आंदोलनात सहभागी झाले होते. जम्मू काश्मीर नॅशनल अवामी पार्टी, यूके आणि जम्मू काश्मीर नॅशनल स्टुंडट फेडरेशनने या आंदोलनात सहभाग घेतला. मात्र पाकिस्तानी नेत्यांच्या सहभागामुळे आंदोलनकारी नाराज आहे. या आंदोलनकर्त्यांनी नेत्यांच्या भाषणाला विरोध केला इतकचं नाही तर त्यांच्यावर बूट आणि अंडी फेकून मारण्यात आली.
एक ब्रिटिश पाकिस्तानी आंदोलकांनी सांगितले की, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बॅरिस्टर सुल्तान महमूद चौधरी यांना पाठवलं होतं. ते काश्मीरी आंदोलकांना संबोधित करण्यासाठी गेले होते. सुल्तान महमूद चौधरी पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील तहरीक-ए-इंसाफचे अध्यक्ष आहेत. बॅरिस्टर सुल्तान 35 ते 40 सुरक्षारक्षकांसह आले. मात्र त्यांचे स्वागत अंडी आणि बुटांनी करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला.
भारताविरोधात निदर्शन करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी समर्थकांमध्ये फूट पडली. यामधील काही जणांनी आंदोलन करताना कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित घोषणाबाजी करू नये आणि भाषण दिलं जाऊ नये तसेच पाकिस्तानी झेंडा फडकवू नये असं ठरविले होते. बॅरिस्टर सुल्तानसोबत इम्रान खान यांनी चौधरी एम यासीन, फारुक हैदर आणि शाह गुलाम कादिर यांना पाठविले होते. पाकव्याप्त काश्मीरात चौधरी एम यासीन विरोधी पक्षनेता आहेत.
एका आंदोलकाने यासीन यांच्यावर बूट फेकला मात्र त्याचा निशाणा चुकला. यासीन यांना भाषण करून दिले नाही. त्यावेळी कादिर यांनी त्यांच्याकडून माइक हिसकावून घेतला. राजा फारुक हैदर यांच्यावरही आंदोलनकर्ते भडकले. ते मोर्चाचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना यश आलं नाही. त्यानंतर भडकलेल्या आंदोलनकर्त्यांनी स्टेज आणि माइकची तोडफोड केली.