नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान याांच्यातील संबंध दुरावले असल्याने समझोता एक्सप्रेसचा पाकिस्तानकडून थांबविण्यात आल्याचे वृत्त होते. आठवड्यातील सोमवार आणि गुरुवार या दोन दिवसांसाठी सुरु असलेल्या समझोता एक्सप्रेसला पाकिस्तानने थांबविले होते. अट्टारी येथून या ट्रेनला पुढे नेण्यासाठी भारताने त्यांचा ड्रायव्हर पाठवावा, अशी निरोप पाकिस्तानने दिला होता. या रेल्वेत एकूण 117 प्रवासी अडकले होते. त्यापैकी 76 भारतीय आणि 41 पाकिस्तानी नागरिक होते. अखेर, समझोता एक्सप्रेस अट्टारी रेल्वे स्थानकावर पोहोचली.
इस्लामाबादने आपल्या रेल्वे ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकास भारतात पाठविण्यास नकार दिला होता. त्यामुळे, अखेर भारताने ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षक पाठवून समझोता एक्सप्रेस भारतात आणली. दरम्यान, पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद अहमद यांनी समझोता एक्सप्रेसची सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. तसेच, ज्या नागरिकांनी तिकीट खरेदी केले आहे, त्यांनी विभागीय रेल्वे कार्यालयातून आपले पैसे परत घेऊन जावे, असेही म्हटले आहे. यापुढे केवळ ईदच्या सणालाच प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या रेल्वेच्या डब्ब्यांचा वापर करण्यात येणार आहे.
22 जुलै 1976 साली समझोता एक्सप्रेस सुरु करण्यात आली होती. यापूर्वी बालाकोट येथील हल्ल्यानंतर सीमारेषेवरील तणावामुळे 26 फेब्रुवारी रोजी ही रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. मात्र, वातावरण पूर्वव्रत झाल्यानंतर सेवा सुरू करण्यात आली होती. या रेल्वेगाडीत 6 स्लीपर कोच आणि एक एसी 3 टियर कोच आहे. भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कलम 370 आणि 35 ए हटविल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.
पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विमानांच्या मार्गांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर, आता भारत-पाकिस्तान या दोन देशांतील नागरिकांना जोडणारी समझोता एक्सप्रेसही पाकिस्तानकडून थांबविण्यात आली आहे. भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या विरोधात पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या सिव्हिल अॅव्हिएशन ऑथॉरिटीद्वारे एक नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये 6 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान ही हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, समझौता एक्सप्रेसबद्दल किती दिवसांसाठी बंद, हे निश्चितपणे सांगण्यात आलं नाही. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण युद्धाला तैयार असल्याचं म्हटलं असून सीमारेषेवर सैन्यही तैनात करण्यात आले आहे.