नवी दिल्ली, दि. 22 - पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी संयुक्त राष्ट्रांत (UN) पुन्हा एकदा काश्मीर मुद्याचा राग आळवला. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत बोलताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्राकडे काश्मीरमध्ये एक विशेष दूत तैनात करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करताना त्यांनी असाही कांगावा केला आहे की, काश्मीर लोकांचा संघर्ष भारताकडून मोडीत काढण्यात येत आहे. शिवाय, भारताकडून पाकिस्तानात दहशतवादी कारवायाही चालवण्यात येतात, असा आरोपही यावेळी अब्बासी यांनी केला.
काश्मीर मुद्यावर बोलताना अब्बासी म्हणाले की, जम्मू काश्मीरमधील लोकांचा संघर्ष भारत मोडीत काढत आहे. दरम्यान UNमध्ये आपल्या संपूर्ण भाषणादरम्यान अब्बासी यांनी 17 वेळा काश्मीर मुद्याचा तर 14 वेळा भारताचा उल्लेख केला. अब्बासी यांनी यावेळी असाही कांगावा केला की, पाकिस्तान देश निर्माण झाल्याच्या पहिल्या दिवसापासून वारंवार शेजारील देशाच्या (भारत) शत्रुत्वाचा सामना करावा लागत आहे. तसंच, भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांची अंमलबजावणीही करत नाही. या प्रस्तावात जम्मू काश्मीरमधील लोकांना आत्मनिर्णयाचा अधिकार आहे. मात्र काश्मिरींना स्वतःसाठी निर्णय घेण्याची अनुमती देण्याऐवजी भारतानं येथे 7 लाख सैनिक तैनात केलेत.
पुढे ते असेही म्हणाले की, काश्मीर मुद्दा न्याय, शांततापूर्वक आणि जलद गतीनं सोडवला पाहिजे. मात्र भारत पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास तयार नाही. अशा परिस्थिती संयुक्त राष्ट्रांना काश्मीरमध्ये एक विशेष दूत तैनात करायला हवा, अशी मागणी करत पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे कांगावा केलाय. अब्बासी यांनी भारतावर शस्त्रसंधी उल्लंघनाचा आरोप करत म्हटले की, ''या वर्षात जानेवारीपासून ते आतापर्यंत भारतानं जवळपास 600 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. मात्र पाकिस्ताननं प्रत्येकवेळी संयम बाळगला आहे. जर भारतानं सीमारेषेवर गोळीबार करणं थांबवलं नाही तर पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी कारवाई करावी लागले''.
पॅलेट गन वापराचा उल्लेख करत अब्बासी म्हणाले की, भारतीय लष्करानं पॅलेट गनचा वापर करुन हजारो काश्मिरी आणि त्यांच्या मुलांना आंधळं केले आहे. यूएननं काश्मीरमध्ये अत्याचार घडवणा-यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही अब्बासी यांनी यावेळी केली.