संयुक्त राष्ट्र : बेजबाबदार भाषणावरून संयुक्त राष्ट्रात भारताच्या सचिव विदीशा मैत्रा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव विदिशा मैत्रा यांनी इम्रान खान यांनी केलेल्या भाषणावर उत्तर देताना सांगितले की, इम्रान खान यांनी अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी देऊन भारतात अशांतता माजवण्याचा प्रयत्न केला आहे.
इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रात भाषण करून जागतिक मंचाचा दुरुपयोग केला आहे. त्यांनी भारताविषयी केलेला भाष्य पूर्णपणे खोटे आहे. पाकिस्तानात दहशतवादी नाहीत, हे निरीक्षक पाठवून चौकशी करा, असे इम्रान खान यांनी सांगितले. मात्र, दहशतवाद्यांना पेन्शन का दिली जाते, हे इम्रान खान सांगू शकतील का, असा सवाल करत विदिशा मैत्रा यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल चढवला आहे. तसेच, पाकिस्तानने खुलेआम ओसामा बिन लादेनचे समर्थन केले, असेही त्या म्हणाल्या.
मानवाधिकार संबंधी बातचीत करणाऱ्या पाकिस्तानने आधी अल्पसंख्यकांची परिस्थिती पाहिली पाहिजे. अल्पसंख्यांकांची संख्या 23 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांवर पोहोचली आहे. पाकिस्तानला इतिहास विसरुन चालणार नाही. 1971 मध्ये पाकिस्तानने आपल्या लोकांसोबत काय केले होते, याचे स्मरण केले पाहिजे, अशा शब्दात विदिशा मैत्रा यांनी पाकिस्तानला धारेवर धरले.