इस्लामाबाद - पाकिस्तानातील राजकीय नेत्याच्या मुलीने आपल्याच लष्कराची घाण काढली आहे. पाकिस्तानातील तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या नेत्या शीरीन मझारींची मुलगी इमान मझारीने रास्तो रोको करणा-या कट्टरपंथीयांच्या मागण्या मान्य केल्याबद्दल लष्करावर अत्यंत कडवट शब्दात टीका केली आहे. पाकिस्तानी लष्कराची लाज वाटते. दहशतवादाविरोधात बलिदान देणा-या शहीदांचे उदहारण देतात पण त्याच दहशतवाद्यांशी हातमिळवणी करुन पैसे पुरवतात. पाकिस्तानी लष्कराची लाज वाटते या शब्दात इमान मझारीने पाकिस्तानी लष्कराची इज्जत काढली आहे.
हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर काहीवेळातच इमानचे अकाऊंट टि्वटरवरुन गायब झाले असे पाकिस्तानी मीडियाने म्हटले आहे. हा व्हिडिओ काढून टाकण्याआधी पाकिस्तानात मोठया प्रमाणावर पाहिला गेला असे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या कायदा मंत्र्यांनी अल्लाहच्या नावावर शपथ घेण्यासंबंधी कायद्यामध्ये बदल केला होता. त्याविरोधात तहरीक-ए-लबाइक संघटनेने आंदोलन पुकारले होते.
त्यांनी इस्लामाबाद-रावळपिंडी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारे रस्ता रोखून धरला होता. पाकिस्तानच्या न्यायालयाने सरकारचे कान उपटल्यानंतर सरकारने आंदोलकांविरोधात शक्ती प्रयोग करुन हटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाकिस्तानात मोठा हिंसाचारही झाला. याच मुद्यावरुन इमानने पाकिस्तानी लष्करावर टीका केली आहे.
लष्कराने या आंदोलनात लक्ष घालून सरकारकडून आंदोलकांच्या सर्व मागण्या पूर्ण होतील हे सुनिश्चित केले असा खुलासा तहरीक-ए-लबाइकचा प्रमुख खादीम हुसैन रिझवीने केला. तोच धागा पकडून इमानने पाकिस्तानी लष्कराची घाण काढली आहे. इमानची आई शीरीन मझारी यांनी मात्र इमानच्या मतांशी आपण सहमत नसल्याचे स्पष्ट केले आहे. इमानने लष्कराबद्दल जी भाषा वापरली त्याचा मी निषेध करते. आई म्हणून इमानवर मी प्रेम करते पण तिच्या मताशी मी सहमत नाही असे शीरीन यांनी स्पष्ट केले आहे.