वॉशिंग्टन : पाकिस्तानला दहशतवादाचा पुरस्कार करणारा देश घोषित करण्यासाठी अमेरिकी संसदेत एक विधेयक मांडण्यात आले आहे. पंतप्रधान नवाज शरीफ काश्मीर मुद्यावर पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करीत असताना दोन अमेरिकन खासदारांनी हे विधेयक आणून पाकला धक्का दिला. शरीफ संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला आलेल्या जागतिक नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन भारतासोबतचा वाद आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न करीत असताना रिपब्लिकन पक्षाचे टेड पो आणि डेमोक्रॅटिक पार्टीचे डाना रोहराबाचर यांनी पाकिस्तान स्टेट स्पॉन्सर आॅफ टेररिझम डेसिगनेश अॅक्ट हे विधेयक प्रतिनिधीगृहात मांडले. पाकने विश्वासघात केला. त्यामुळे त्याची आर्थिक रसद बंद करण्याची वेळ आली आहे, असे पो म्हणाले. पो दहशतवादावरील संसदीय उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आता अमेरिकेला पाकला दहशतवाद पुरस्कार करणारा देश घोषित करावे लागेल किंवा मग तसे का करता येत नाही याचे कायदेशीर स्पष्टीकरण द्यावे लागेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)>पाकची निष्क्रियता भारताच्या भीतीमुळे भारताची भीती असल्यामुळे पाकिस्तान दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईस धजावत नसल्याचे अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री सलाहुद्दीन रब्बानी यांनी म्हटले आहे. पाकने आपल्या भूमीवरील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेसाठी रब्बानी येथे आले आहेत. >अण्वस्त्रांबाबत पाकने मर्यादा पाळावी उरीतील हल्ल्यानंतर भारत पाकवर कारवाईसाठी पर्याय शोधत आहे. दुसरीकडे पाकिस्तान आडमुठ्या भूमिकेवर कायम असल्याचे दिसून येत आहे. अण्वस्त्रांबाबत पाकने मर्यादा पाळावी, असा सल्ला अमेरिकेने दिला आहे. मात्र आमच्यावर प्रतिबंध लादता येणार नाहीत, असे स्पष्टीकरण संयुक्त राष्ट्र संघातील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी मलिहा लोधी यांनी दिले आहे. अमेरिकेचे विदेशमंत्री जॉन केरी यांनी बैठकीदरम्यान पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना सांगितले की, पाकने अण्वस्त्र कार्यक्रम मर्यादेत ठेवावा. यावर शरीफ यांनी स्पष्ट केले की, पाककडून जी अपेक्षा केली जात आहे त्याची भारताकडूनही अंमलबजावणी व्हावी. लोधी म्हणाले की, भारताकडून अण्वस्त्रांच्या ज्या हालचाली सुरू आहेत त्याअगोदर थांबवायला सांगितले जावे.>शरीफ यांना वेगळे पडण्याच्या भीती वेगळे पडण्याच्या भीतीने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे येथे संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रादरम्यान जगातील नेत्यांना भेटून काश्मीरचा मुद्दा उपस्थित करीत आहेत; पण भारतासोबतच्या वादाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा त्यांचा प्रयत्न कोणाचेही लक्ष वेधून घेताना दिसून येत नाही. नवाज शरीफ यांनी केली सैन्यप्रमुखांशी चर्चा : संयुक्त राष्ट्रातील आपल्या भाषणापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सैन्यप्रमुख जनरल राहील शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी ते काश्मीरचा मुद्दा बाजूला ठेवू शकतात. पंतप्रधान कार्यालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी रात्री या दोन नेत्यांनी भारतासोबतच्या तणावपूर्ण स्थितीबाबत चर्चा केली. दरम्यान, नवाज शरीफ हे काश्मीर मुद्याच्या तोडग्यासाठी प्रस्तावही दाखल करू शकतात. >दहशतवादाविरुद्ध ‘ब्रिक्स’ला हवीय कायदेशीर चौकटदहशतवादाविरुद्ध परिणामकारकरीत्या लढण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत कठोर कायदेशीर चौकट निर्माण करावी, अशी मागणी ब्रिक्स देशांनी केली. भारतासह ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांची संयुक्त राष्ट्र आमसभेदरम्यान येथे बैठक झाली. या बैठकीत भारतातील हल्ल्यासह सर्व दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करण्यात आला.
पाक दहशतवादी देश!
By admin | Published: September 22, 2016 4:22 AM