इस्लामाबाद - पाकिस्तानातील जेलमध्ये बंद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पत्नी आणि आईला भेटण्यापूर्वी परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. हेरगिरीच्या आरोपांवरुन कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ही भेट होणार आहे. पाकिस्तानातील अधिका-यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये परराष्ट्र मंत्रालयाबाहेर शार्प शूटर्सदेखील तैनात करण्यात आले आहेत. कुलभूषण जाधव पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालय कार्यालयात आपल्या आई व पत्नीची भेट घेणार आहेत.
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं कुलभूषण जाधव व त्यांच्या पत्नी-आई भेटीच्या वेळेबाबत अद्यापपर्यंत माहिती दिलेली नाही. मात्र दुपारच्या सुमारास जाधव कुटुंबीयांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भेट केवळ अर्धा तासासाठी होणार आहे. दरम्यान, जाधव यांच्या आई व पत्नी इस्लामाबाद येथे दाखल झाल्या आहेत.
पाकिस्तानकडून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न
मात्र, सकाळपासूनच या भेटीबाबत गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वीच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्ताकडून भारताला कुलभूषण जाधव यांचा कॉन्स्युलर अॅक्सेस देण्यात आल्याचे सांगितले. मात्र, भारताकडून हे वृत्त फेटाळण्यात आले होते. त्यामुळे कुलभूषण जाधव यांच्या कॉन्स्युलर अॅक्सेसवरून अजूनही संभ्रम आहे. कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीसोबतची भेट साधारण 12.30 वाजता होईल. त्यांना भेटण्यासाठी केवळ 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. मात्र, तुरुंगातील नियमांचा दाखला देत पाकिस्तानने या भेटीत आडकाठी घातली आहे. त्यामुळे ही भेट आणखी काही काळ लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ख्वाजा आसिफ यांनी जिओ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, कुलभूषण जाधव आज त्यांच्या आई व पत्नीला भेटतील. त्यावेळी भारतीय अधिकारीही उपस्थित राहू शकतील. परंतु, आमच्या जागी भारत असता तर त्यांनी आम्हाला कॉन्स्युलर अॅक्सेस दिला असता का, असा खोचक प्रश्नही ख्वाजा आसिफ यांनी विचारला.
20 डिसेंबर रोजी कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानने व्हिसा जारी केला होता. त्यामुळे मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी जाण्याचा कुटुंबीयांचा मार्ग मोकळा झाला. हेरगिरी व दहशतवादाच्या आरोपावरून जाधव यांना पाकच्या लष्करी न्यायालयाने देहदंडाची शिक्षा सुनावली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या अपिलावरून मे महिन्यात शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे जगभरात पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली होती.
तात्काळ फाशीचा धोका नाही, पाकिस्तानची माहितीआई आणि पत्नीला दिलेली भेटीची संधी ही शेवटची संधी ठरणार नाही, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी दिली आहे. गुरूवारी या संदर्भातील माहिती समोर आली. कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला त्यांच्या भेटीसाठी दिलेली परवानगी ही पूर्णपणे मानवतेच्या दृष्टीने देण्यात आली असून कुलभूषण जाधव यांना तात्काळ फाशीचा कुठलाच धोका नाही, असं गुरूवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत डॉ.मोहम्मद फैसल यांनी म्हटलं. कुलभूषण जाधव यांची दया याचिका अजूनही प्रलंबित असल्यानं ही बाब स्पष्ट होते, असंही ते म्हणाले. कुलभूषण जाधव यांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट झाल्यावर त्यांना तात्काळ फाशी देण्यात येईल का ? यांसारख्या प्रश्नावर मोहम्मद फैसल यांनी उत्तरं दिली आहेत.
कुलभूषण जाधव यांच्या आईला आणि पत्नीला भेटीसाठी देण्यात आलेली संधी ही इस्लामी परंपरेनुसार पूर्णपणे मानवतेचा विचार करुन देण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने या दोघींनाही व्हिसा मंजूर केला आहे. त्यांची जाधव यांच्याशी पाकिस्तानातील परराष्ट्र मंत्रालयात भेट होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय उच्चायुक्तांमधील एका प्रतिनिधीलाही जाण्याची परवानगी देण्यात येईल, असंही डॉ. फैसल यांनी म्हंटलं. पाकिस्तानकडून जाधव यांच्या आई आणि पत्नीला माध्यमांशी बोलण्याचीही परवानगी दिली जाणार आहे. या संदर्भात आम्ही भारताच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचं फैसल यांनी सांगितलं.