टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. सुरुवातीचे सर्व सामने जिंकल्यानंतर पाकिस्तानला विश्वचषक जिंकण्याचा विश्वास होता, पण ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा विजयी रथ अखेर थांबवला. यानंतर एकीकडे संपूर्ण पाकिस्तान निराश दिसत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानच्या पराभवाचा आनंद साजरा केला जातोय.
तारीक फतेह आणि हकीम बलोचने शेअर केला व्हिडिओपाकिस्तानच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील जल्लोषाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एका व्हिडिओमध्ये बलुचिस्तानमधील लोक पाकिस्तानच्या पराभवानंतर जल्लोषात नाचताना दिसत आहेत. पाकिस्तानी वंशाचे कॅनेडियन पत्रकार तारिक फतेह आणि बलुच नॅशनल मूव्हमेंट(यूके झोन)चे अध्यक्ष हकीम बलोच यांनी ट्विटरवर बलुच लोकांचा नाचतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
काय आहे बलुच नॅशनल मूव्हमेंट ?
बलुचिस्तान हा पाकिस्तानचा प्रांत आहे, त्याची राजधानी क्वेटा आहे. बलुचिस्तानचे लोक पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. तिथले लोक बलुच नॅशनल मुव्हमेंट या नावाने चळवळ चालवतात. बलुचिस्तानला पाकिस्तानपासून मुक्त करणे हा त्याचा उद्देश आहे. पण, त्यांचे आंदोलन दडपण्यासाठी अनेकदा पाकिस्तानी लष्कराने बलुच लोकांवर अत्याचार केला आहे. पाक लष्कराच्या अत्याचाराला कंटाळून बलुच कधी-कधी त्यांच्यावर हल्लेही करतात. अलीकडेच चिनी अभियंत्यांच्या बसमध्ये झालेल्या स्फोटाचे कनेक्शनही बलुचिस्तानमधून सापडले होते.