इस्लामाबाद - आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सरकारने सातत्याने केलेला पाठपुरावा आणि आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे कुलभूषण जाधव प्रकरणात घेतलेली आडमुठी भूमिका पाकिस्तानने काहीशी मवाळ केली आहे. पाकिस्तानने कारागृहात बंद असलेले कुलभूषण जाधव यांना भेटण्याची परवानगी त्यांच्या पत्नीला दिली आहे. मानवतेच्या भावनेतून कुलभूषम जाधव यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
भारतातील निवृत्त नौदल अधिकारी असलेल्या ४६ वर्षीय जाधव यांना मार्च २0१६ मध्ये बलुचिस्तानात अटक केल्याचा दावा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला होता. पाकच्या लष्करी न्यायालयाने त्यांना हेरगिरी आणि घातपाती कारवायांच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली आहे. भारताने दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश गतवर्षी १३ डिसेंबर रोजी दिले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीस स्थगिती देत पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली होती.
दरम्यान, कुलभूषण जाधव यांची सुटका करण्यासाठी भारताने पेशावर आर्मी पब्लिक स्कूलवर हल्ला करण्या-या दहशतवाद्याला सोडण्यास तयार असून अदलाबदली करण्याची ऑफर दिल्याचा दावा या प्रकरणात भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असलेल्या पाकिस्तानने सप्टेंबरमध्ये केला होता. मात्र भारताने पाकिस्तानचा खोटारेडपणा उघड केला होता. 'अफगाण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कार्यालयाकडून जारी करण्यात आलेली प्रेस रिलीज तुम्ही सर्वांनी पाहिली आहे. प्रेस रिलीज पाहिली तर पाकिस्तानने आपल्या लांबलचक यादीत अजून एक काल्पनिक खोटं जोडलं आहे. पाकिस्तानने अजून एक आपण स्वत: रचलेली स्टोरी जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे', असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगत पाकिस्तानचे पितळ उघडे केले होते.