India vs Pakistan, Yasin Malik wife: भारताच्या तुरुंगात बंदिस्त काश्मिरी दहशतवादी यासिन मलिकची पत्नी मुशालच्या माध्यमातून नापाक कारवाया करण्याची तयारी पाकिस्तानने सुरू केली आहे. मुशाल मलिक हिला पाकिस्तानी लष्कराच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या काळजीवाहू सरकारमध्ये मानवाधिकार आणि महिला सक्षमीकरण या विषयावर पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक बनवण्यात आले आहे. आता पाकिस्तान मुशालला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या बैठकीत पाठवू शकते, जेणेकरून काश्मीरबाबत पाकिस्तानला आपला अजेंडा पुढे रेटता येईल. मुशालचा वापर करून पाकिस्तान संयुक्त राष्ट्रात स्वतःबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
मुशाल मलिकने आपल्या अल्पवयीन मुलीसह मंगळवारी पाकिस्तानचे काळजीवाहू परराष्ट्र मंत्री जलील अब्बास जिलानी यांची भेट घेतली. मुशाल आणि जिलानी या दोघांचेही काश्मीरचा मुद्दा जागतिक स्तरावर मांडण्यावर एकमत झाले. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ट्विटरवर लिहिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'मी मुशाल मलिक यांचे स्वागत केले. काश्मीरमधील कथित मानवाधिकार उल्लंघनाबाबत जागतिक जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही मानवाधिकार मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्यातील सहकार्य वाढविण्यावर चर्चा केली.'
संयुक्त राष्ट्र महासभेच्या आगामी अधिवेशनात पाकिस्तानची भूमिका मांडण्यासही दोघांनी सहमती दर्शवल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मुशाल मलिकला संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीत घेण्याची तयारी केली आहे. या अधिवेशनासाठी काळजीवाहू पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्रीही जाणार आहेत. आतापर्यंत फक्त पाकिस्तानी पंतप्रधानच काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात मांडत आहेत. भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संयुक्त राष्ट्र महासभेत सहभागी होणार आहेत.
मुशाल आणि पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांनीही काश्मीरमधील कथित मानवाधिकार उल्लंघनावरून टीका केली. यासीन मलिकला भारतीय न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा दोघांनीही जागतिक स्तरावर दाद मागितली. मुशाल मलिकनेही ट्विट करून काश्मीरबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांशी बोलल्याचे म्हटले आहे. खरे तर 'पाकिस्तानचा हस्तक असा आरोप असलेल्या' यासिन मलिकला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तान आणि मुशाल मलिक दोघांनीही भारतावर प्रचंड आगपाखड केली आहे. आता मुशाल आणि तिच्या मुलीचा वापर पाकिस्तान भारताविरोधात अपप्रचार करण्यासाठी करणार असल्याचे बोलले जात आहे.