Pakistan Army Chief : पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी पाकिस्तानी लष्कराची हतबलता आणि रणगाडय़ांच्या दुरवस्थेबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमध्ये आता बाजवा यांच्या कोर्ट मार्शलची मागणी जोर धरत असतानाच पाकिस्तानी लष्करानं या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय. बाजवा यांचे अनौपचारिक विधान चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आलंय, असे पाकिस्तानी लष्करानं सांगितलं. पाकिस्तान सर्व प्रकारे युद्धासाठी सज्ज असल्याचा दावा त्यांनी केला.
पाकिस्तानी लष्कराच्या आयएसपीआरनं असंही म्हटलं आहे की पाकिस्तानी लष्करानं आपली शस्त्रं, उपकरणं आणि सैनिकांना अशा प्रकारे तयार केलं आहे आहेत की ते पाकिस्तानचं रक्षण करू शकतील आणि ते पुढेही करत राहतील. पाकिस्तानी लष्करानं हे स्पष्टीकरण अशावेळी दिलं आहे, जेव्हा जनरल बाजवा यांनी रणगाड्यांच्या दुरवस्थेबाबत केलेले वक्तव्य प्रसिद्ध पत्रकार हमीद मीर यांच्यापुढे आल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. हमीद मीर यांनी एक टीव्ही पत्रकार नसीम जेहरा यांच्यासोबत एका कार्यक्रमात बाजवा यांच्याबद्दल मोठा खुलासा केला होता.
मीर यांनी केला होता खुलासापाकिस्तानमधील परिचित पत्रकार हामिद मीर यांनी एका मुलाखतीत यासंदर्भातील खुलासा केलाय. “बाजवांनी भारत आणि पाकिस्तानातील संबंध सुधारण्यासाठी भारताचे एनएसए अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली होती,” असं त्यांनी सांगितलं. ब्रिटन स्थित पाकिस्तानी मीडिया युके ४४ ला मीर यांनी दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला. भारताविरोधात लढण्यासाटी पाकिस्तानी लष्कराकडे ना तर दारुगोळा आहे ना टँकमध्ये भरण्यासाठी डिझेल असल्याचं बाजवांनी काही ज्येष्ठ पत्रकारांना सांगितल्याचं मीर म्हणाले.
टँकसाठी डिझेलच नाही“कमांडर्सच्या मीटिंगमध्ये बाजवांनी सांगितलं होतं की पाकिस्तानी लष्कर भारतीय लष्कराचा सामना करू शकत नाही. टँकसाठी आमच्याकडे डिझेलही नाही,” असं बाजवा म्हणाले असल्याचं मीर यांनी नमूद केलं. बाजवा यांनी भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी प्रस्ताव दिला होता. तसंच काश्मीर प्रकरणीही तोडगा शोधण्यावर ते काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. “बाजवांनी २०२१ मध्ये खुलासा केला होता की त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासोबत चर्चा केली होती. तसंच सिझफायरच्या घोषणेनंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान दौऱ्याची योजना आखली होती. काश्मीरबाबतही बाजवांनी एक तोडगा काढला होता. त्याबाबत त्यांनी पाकिस्तानी जनतेला कधीही सांगितलं नाही,” असा दावा मीर यांनी केला.