इस्लामाबाद - जम्मू काश्मीरमधील केंद्र सरकारची पावलं आणि कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. इम्रान खान सरकारने पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा कार्यकाळ ३ वर्षांसाठी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाक पंतप्रधान कार्यालयाकडून दिलेल्या माहितीनुसार देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी इम्रान खान यांनी हा निर्णय घेतला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये असणाऱ्या परिस्थितीमुळे पाकिस्तान सरकारने घेतलेला हा निर्णय महत्वाचा आहे. अलिकडेच पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र संघात फटकारण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर प्रकरणावर पाकिस्तानला चीनशिवाय इतर कोणत्याही देशांनी पाठिंबा दिला नाही.
कमर जावेद बाजवा यांनी २९ नोव्हेंबर २०१६ रोजी सेवानिवृत्त जनरल राहिल शरीफ यांचे स्थान घेतले होते. बाजवा यांच्या नावावर माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी शिक्कामोर्तब केलं होतं. काश्मीर मुद्द्याची माहितीसोबत अनेक वर्षे भारताच्या सीमा नियंत्रण रेषेवरही काम करण्याचा त्यांचा अनुभव जास्त आहे.
नियंत्रण रेषेवरील त्यांचा अनुभव पाहता बाजवा यांचा कार्यकाळ वाढविला असल्याचं पाकमधील सुरक्षा तज्ज्ञांनी सांगितले. काश्मीर प्रकरणांवर बाजवा यांचा तगडा अभ्यास आहे. सध्याच्या परिस्थितीत त्यांचा कार्यकाळ वाढविणे पाकिस्तानला योग्य वाटतं. बाजवा यांनी कांगो यूएन मिशन दरम्यान माजी भारतीय लष्करप्रमुख जनरल विक्रम सिंह यांच्या विभागात काम केलं.