इस्लामाबाद - पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा हिशेब चुकता करू, असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी लष्कराचा गुरुवारी (6 सप्टेंबर) रावळपिंडीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पाकिस्तानचे लष्कप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी अप्रत्यक्षरित्या भारताला धमकी दिली. दरम्यान, या कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानदेखील उपस्थित होते.
पाकिस्तानच्या सीमेवर ज्या सैनिकांनी आपलं रक्त सांडवलं आणि देशासाठी प्राण गमावले, त्यांच्या रक्ताचा हिशेब चुकता करणार, असे विधान यावेळेस पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी केले आहे.
''6 सप्टेंबर 1965 हा दिवस पाकिस्तानासाठी महत्त्वाचा दिवस आहे. झालेल्या या युद्धातून आमचे सैनिक आजही प्रेरणा घेतात. 1965 आणि 71 च्या युद्धातून आम्ही खूप शिकलो'', असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जगभरात वाढलेल्या दहशतवादी कारवायांचा फटका पाकिस्तानलाही बसला. देशात दहशतवादी हल्ले झाले, देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. यात हजारो सैनिकांचे प्राण गेले आणि जखमी झाले. हे पाकिस्तान कधीच विसरु शकणार नाही, असे त्यांनी सांगितले.