पाकिस्तानमध्ये राजनैतिक संकटाचे ढग दाटू लागले आहेत. इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाची उलटी गणना सुरु झाली आहे. येत्या २८ मार्चला पाकिस्तानच्या संसदेत विरोधी पक्ष इम्रानविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत. याला इम्रान खावन यांच्या सरकारमधील मित्र पक्षांचादेखील पाठिंबा आहे. यातच लष्करप्रमुख बाजवांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने पुढील आठवड्यात राजकारण तापणार आहे.
इम्रान खान यांनी आपली खुर्ची वाचविण्यासाठी हातपाय मारण्यास सुरुवात केली होती. त्यांनी लष्कर आपल्यासोबत असल्याचे म्हटले होते. अविश्वास ठराव य़ेण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी २७ मार्चला १० लाख लोकांना इस्लामाबादच्या डी चौकात आंदोलनासाठी बोलविले आहे.
इम्रान खान यांना लष्कराने धक्का दिला आहे. लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी परिस्थिती पाहून तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इम्रान खान यांच्यापुढील संकटात वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे इम्रान यांच्याच पाकिस्तान तहरीक ए इंसाफ (PTI) मधून वेगळ्या झालेल्या गटाने विरोधकांना समर्थन दिले आहे. यामुळे इम्रान खान यांना पंतप्रधान पद सोडावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. रावळपिंडीतील सैन्य मुख्यालयदेखील या संकटावर शांत राहणार आहे.
विरोधक दोन पर्यायांवर विचार करत असल्याचे समजत आहे. एक म्हणजे पाकिस्तान मुस्लिम लीगने (नवाझ) शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करावे आणि सार्वत्रिक निवडणुका घ्याव्यात. दुसरा पर्याय म्हणजे पाच वर्षांसाठी राष्ट्रीय सरकार स्थापन करणे, कारण पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परंतू, शाहबाज यांचे बंधू आणि निर्वासित नेते नवाझ शरीफ हे लवकरात लवकर निवडणुकां घेण्याच्या बाजूने असल्याचे समजते. यामुळे दुसरा पर्याय विचारात घेतला जाणार नसल्याचे समजते.