भारताच्या वज्र तोफेने बिथरलेल्या पाकिस्तानी लष्कराने चीनमध्ये तयार केलेल्या 155 मिमी SH-15 स्वयंचलित तोफेचा आपल्या ताफ्यात समावेश केला आहे. ही तोफ अधिक अंतरापर्यंत मारा करू शकते आणि यामुळे लष्कराला अधिक बळकटी मिळेल, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी दिली. पाकिस्तानने चीनला 52 तोफांची ऑर्डर दिल्याचं सांगण्यात येत आहे. चीनची ही अत्याधुनिक तोफ जवळपास 53 किमीपर्यंत मारा करू शकते. जर पाकिस्तान छोटा अणुबॉम्ब बनवण्यात यशस्वी झाला, तर या तोफेच्या मदतीने तो डागता येऊ शकेल असं मत संरक्षण क्षेत्रातील काही तज्ज्ञानी व्यक्त केलं.
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार S15 तोफ सहजपणे कुठेही नेली जाऊ शकते. 155 मिमी तोफ. ही तोफ घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या खिडक्या बुलेटप्रूफ आहेत. याची रेंज 53 किलोमीटर असल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते याची रेंज 72 किमी इतकी आहे. 5 जणांची टीम हे ऑपरेट करू शकते. तसंच याचं एकूण वजन 22 टन इतकं आहे. स्वसंरक्षणासाठी या तोफेवर मशीनगनही बसवता येते. ही तोफ कुठेही तैनात केली जाऊ शकते, असा दावाही पाकिस्ताननं केला आहे.