इस्लामाबाद : तालिबान समर्थित टीटीपी या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे. शंभरहून अधिक पाकिस्तानी सैनिकांना मारणाऱ्या या संघटनेने पाकिस्तानच्या वर्मावर घाव घालून पाकिस्तानातच वेगळा इस्लामिक देश निर्माण करण्याची तयारी केली आहे.
टीटीपी दहशतवाद्यांच्या ताब्यात जाणाऱ्या या वेगळ्या इस्लामिक देशात शरिया कायदा लागू करण्यात येणार आहे. चीनच्या दबावाखाली पाकिस्तान या दहशतवादी संघटनेसोबत शांतता करार करणार आहे. टीटीपी दहशवादी पाकिस्तानात लोकांनी निवडलेल्या सरकार ऐवजी आपले सरकार असावे यासाठी प्रयत्न करत आहेत. हे सरकार शरिया कायद्यावर चालविण्याचा त्यांचा विचार आहे. यामुळे या दहशतवाद्यांनी ऑगस्ट २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान कमीकमी ११९ पाकिस्तानी सैनिक मारले आहेत. टीटीसोबत चर्चा सुरु असताना पाकिस्तानी लष्कराने अनिश्चित काळासाठी सीजफायर करण्याची घोषणा केली होती. तसेच टीटीपीच्या नेत्यांच्या तुरुंगातून सुटका करण्याचेही मान्य केले आहे.
देश वाचविण्यासाठी पाकिस्तानला एका प्रांताचा बळी द्यावा लागणार आहे. पाकिस्तानी सैन्य आणि टीटीपी यांच्यात तालिबानचा कुख्यात दहशतवादी आणि गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी याने चर्चा घडवून आणली आहे. हक्कानी टीटीपीला संरक्षण देत आहे. टीटीपीचे अफगाणिस्तानमध्ये तीन ते ५ हजार दहशतवादी आहेत. टीटीपीसोबत शांतता करार झाला की हे दहशतवादी पाकिस्तानात येण्याची शक्यता आहे. यामुळे कबायली हा भाग दहशतवाद्यांचा गड बनणार आहे.
या भागात शरिया कायदा लागू करण्यात यावा, ही टीटीपीची प्रमुख मागणी आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये हा भाग येतो. तेथील अवामी नॅशनल पार्टीचे प्रमुख नेत्याने सांगितले की, टीटीपीला आता हरविता येणार नाही हे स्पष्ट झाले आहे. तालिबान आणि पाकिस्तानी सैन्याचे चांगले संबंध आहेत. तसेच टीटीपीच्या वाढत्या ताकदीला चीनचे देखील समर्थन आहे.
पाकिस्तानच्या एका नेत्यानेच काही दिवसांपूर्वी चीन टीटीपीसाठी दबाव टाकत असल्याचे म्हटले होते. टीटीपीने नजिकच्या काळात चीनचे महत्वाचे प्रकल्प आणि चिनी लोकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली होती. यामुळे चीनने टीटीपीसोबत सहकार्य करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर प्रमुख बाजवांवर दबाव टाकला आहे. या डीलनंतर टीटीपीने देखील चीनविरोधात हल्ले न करण्याचा शब्द दिला आहे.