इस्लामाबाद - पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेत आणि संरक्षण व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणा-या पाकिस्तान लष्कराचे मुख्यालय रावळपिंडीतून इस्लामाबादमध्ये येणार आहे. त्यासाठी १००० एकर जागा लष्कराला मिळणार असल्याचे पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तांतून स्पष्ट झाले आहे.
पाकिस्तानच्या मुख्यालयाचे स्थलांतर इस्लामाबादमध्ये करावे अशी योजना २००८-०९ साली तत्कालीन लष्करप्रमुख अश्फाक परवेज कयानी यांची योजना होती. मात्र आर्थिक अडचणींमुळे ही योजना प्रत्यक्षात येत नव्हती.
आता मिळणार असलेल्या जागेचा ताबा लवकरात लवकर मिळावा जेणेकरुन तेथे बांधकाम सुरु करता येईल असे लष्करी निर्णयप्रक्रियेतील लोकांचे मत असल्याचे पाकिस्तानातील डाँन या वर्तमानपत्राने वृत्त दिले आहे.
कॅपिटल डेव्हलपमेंट अथोरिटीचे सदस्य आणि डिफेन्स कॉम्प्लेक्स इस्लामाबादच्या सदस्यांची खुशाल खान यांच्या अध्यक्षतेखाली १९ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कॅपिटल डेव्हलपमेंट अथोरिटी इस्लामाबादमधील नागरी सुविधा पुरवण्याचे काम करते. या बैठकीमध्ये दोन्ही संस्थांच्या संदर्भातील प्रश्नांचे निराकरण झाले आहे असे खुशाल खान यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले.
२००९ साली लष्करी पोशाखात दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या लष्कर मुख्यालयावर हल्ला केला होता. त्यानंतर झालेल्या चकमकीच पाकिस्तानचे सहा सैनिक आणि चार दहशतवादी ठार झाले होते. पाकिस्तानची स्थापना झाल्यापासून गेल्या ७० वर्षांमध्ये तेथिल सत्तेत लष्कर कायम प्रबळ राहिले आहे.