दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या लष्करानं पुन्हा एकदा भारताला युद्धाची धमकी दिली आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल अहमद शरीफ यांनी मंगळवारी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत भारताविरोधात वक्तव्य केलं. मेजर शरीफ यांनी धमकी दिली की, जर भारतानं काही गैरप्रकार केला तर पाकिस्तानी लष्कर भारताच्या हद्दीत युद्ध करेल आणि त्याला प्रत्युत्तर देईल. परंतु यानंतर पाकिस्तानच्या प्रसिद्ध पत्रकार नायला इनायत यांनी स्वत: पाकिस्तानी लष्कराच्या या वक्तव्याला कारगिलचं उदाहरण देऊन चोख प्रत्युत्तर दिलं आणि मेजर शरीफ यांची बोलती बंद केली.“पाकिस्तानी सैन्य भारताशी युद्ध करण्यास सक्षम नाही, पाककडे ना पैसा ना टँकसाठी डिझेल”
“अखेरच्या वेळी जेव्हा पाकिस्ताननं भारतीय सीमेत युद्ध केलं तेव्हा आपल्या मृत सैनिकांना त्याच ठिकाणी ठेवून पळ ठोकला. इतकंच नाही तर पाकिस्ताननं आपल्या पंतप्रधानांनी सन्मानानं परतावं यासाठी अमेरिकेला रवाना केलं होतं.” असं ट्वीट नायला इनायत यांनी शरीफ यांच्या वक्तव्याला उत्तर देताना केलं. परवेझ मुशर्रफ यांनी सुरू केलेल्या युद्धाकडे त्यांचा निशाणा होता.
कारगिलमध्ये पाक तोंडघशीजेव्हा भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या मृत सैनिकांना त्यांच्याकडे परत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी त्यांचे मृतदेह घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर भारतीय लष्करानं या पाकिस्तानी सैनिकांवर पूर्ण सन्मानानं अंत्यसंस्कार केले. एवढेच नाही तर पाकिस्तानच्या या भ्याड कृत्याचा पर्दाफाश होताच पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान अमेरिकेला पोहोचले. पाकिस्तानी सैन्याला कारगिलमधून माघार घेण्यासाठी कशीतरी मदत करावी, अशी विनंती नवाझ शरीफ यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना केली होती.
त्यामुळे पाकिस्तानचे नापाक मनसुबे जगासमोर आले आणि मैत्रीच्या गप्पा मारणाऱ्या आणि भारताच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या मुशर्रफ यांचा पर्दाफाश झाला होता. माजी लष्करप्रमुख बाजवा यांच्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू असतानाच पाकिस्तानी लष्कराकडून हे वक्तव्य करण्यात आलंय. पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार हमीद मीर यांनी खुलासा केला की, माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी २५ हून अधिक पत्रकारांसमोर कबुली दिली होती की, देशाच्या लष्कराचे टँक काम करत नाहीत आणि त्यांच्याकडे डिझेलसाठीही पैसे नाहीत.