रावलपिंडी - पाकिस्तानच्या रावलपिंडी शहरात मंगळवारी सकाळी पाकिस्तानी लष्कराचं एक विमान नागरी वस्तीत कोसळलं. या अपघातात आतापर्यंत 15 जण ठार झाल्याची माहिती आहे तर 12 जण गंभीररित्या जखमी आहेत. मृतांपैकी 5 जण पाकिस्तानी सैन्यातील जवान आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाकिस्तानी लष्कराकडून दिलेल्या माहितीनुसार या विमान अपघातात 2 पायलट मृत्यू झालेत. ही दुर्घटना पाहता रावलपिंडीमधील हॉस्पिटलमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. अपघातात 12 जण जखमी आहे त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे.
पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय असलेल्या रावलपिंडी शहरात ही दुर्घटना घडली, अपघातानंतर परिसरात रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण अस्पष्ट आहे. दुर्घटनाग्रस्त विमान प्रशिक्षणासाठी वापरलं जात होतं. त्याचवेळी रावलपिंडी शहराजवळ असलेल्या मोरा कालू या गावात हे विमान कोसळलं. नागरीवस्तीत विमान कोसळल्याने मोठ्या प्रमाणात आवाज येऊन घटनास्थळी आग लागली. यात अनेक घरांचे नुकसान झाले. विमानावरील पायलेटचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने शोधकार्यात अनेक अडथळे निर्माण झाले होते.