दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानात एक खळबळजनक घटना घडली आहे. सैन्याच्या जवानाच्या भावाकडून अनधिकृत शस्त्रास्त्रे जप्त केली म्हणून पाकिस्तानी सैनिकांनी पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांना पळेस्तोवर मारहाण केली आहे.
बुधवारी पंजाब प्रांतातील बहावलनगरच्या पोलीस अधिकाऱ्यांवर सैनिकांनी हल्ला केला. मदरीसा पोलीस ठाण्यातील हा प्रकार आहे. पोलिसांनी सैनिकाच्या भावावर कारवाई करताच ७-८ गाड्यांमध्ये बसून ४०-५० पाकिस्तानी सैनिक पोलीस ठाण्यात घुसले. पोलीस ठाण्याची चावी काढून घेत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रायफलच्या मागच्या भागाने मारायला सुरुवात केली.
पोलीस अधिकाऱ्यांच्या शरीरावरील जखमांचे फोटो आणि मारहाणीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. सैनिकांनी पोलिसांकडून व्हिडीओ रेकॉर्डर काढून घेतले आणि त्यांना लॉकअपमध्ये बंद करून मारहाण केल्याचा दावा केला जात आहे.
या घटनेचे व्हिडीओ, फोटो बाहेर येताच पोलिस प्रशासनाने सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. छोट्या घटनेला तिखट मीठ लावून दाखविले जात असल्याचे पाकिस्तानी पंजाब पोलिसांनी म्हटले आहे. पोलीस विरुद्ध सैन्य असे रंगविले जात असल्याचा आरोप करत आमच्या चौकशीनंतर दोन्ही संस्थांनी शांतपणे हे प्रकरण सोडविल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. सैन्य आणि पोलीस एकत्र मिळून दहशतवादी, बदमाशांवर कारवाई करत असल्याचे म्हटले आहे.