काबुल: भारताविरोधात वेळोवेळी लाज घालवून घेतलेल्या पाकिस्तानी सैन्याची उरली सुरली हवा तालिबानी अतिरेक्यांनी काढून टाकली आहे. ड्युरंड लाईनवर पाकिस्तानला तारांचे कुंपण उभारायचे आहे, परंतू तालिबान ते करायला देत नाहीय. यामुळे दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी गोळीबारही झाला होता. यात काही पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. आता तालिबानींना पाहून पाकिस्तानी सैनिक पळून गेल्याचा प्रकार घडला आहे.
अफगाणिस्तानच्या निमरोज प्रांतात चार बोरजाक जिल्ह्यात तालिबानींनी पाकिस्तानी सैनिकांना पळवून लावले. पत्रकार बिलाल सरवरी यांनी तालिबानच्या हवाल्याने ट्विटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. कुंपन उभारण्यास आलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी तालिबानी येताना पाहून कसे पलायन केले हे यामध्ये आहे. तसेच तारांचे कुंपण उभारण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री तिथेच सोडून गेले असल्याचे दिसत आहे. आता तालिबानने मोठ्या संख्येने दहशतवादी तिथे पहाऱ्यासाठी ठेवले आहेत.
अफगाणिस्तानचे क्षेत्र सध्याच्या सीमेच्या पलीकडे असल्याचा दावा केला आहे. हा एकमेव मुद्दा आहे ज्यावर अफगाणिस्तानचे माजी नागरी सरकार आणि तालिबान यांच्यात सहमती होती. तालिबानने ड्युरंड रेषेवरील पाकिस्तानचे कुंपणही पाडले आहे. अशा स्थितीत तालिबानचा ब्रँड अॅम्बेसेडर बनून जगाकडून देणग्या मागणाऱ्या इम्रान खानच्या संकटात आणखी वाढ होणार हे निश्चित.
अफगाणिस्तानातील बहुसंख्य पश्तून आणि तालिबान यांनी कधीही ड्युरंड रेषा अधिकृत सीमारेषा मानली नाही. तालिबानचा सर्वोच्च प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर लगेचच सांगितले की, नवीन अफगाण सरकार या विषयावर आपली भूमिका जाहीर करेल. पाकिस्तानने बनवलेल्या कुंपणामुळे लोक वेगळे झाले आहेत आणि कुटुंबे विभक्त झाली आहेत, असा दावा त्यांनी केला होता.