वॉशिंग्टन- पाकिस्तानी लष्कराने आतापर्यंतची आपली कट्टरवादी भूमिका बदलली असून, पाक लष्करातील एका मोठ्या गटाची भारताशी वाटाघाटी करण्याची इच्छा आहे; पण अशा वाटाघाटी झाल्या तरीही इतर सर्व पर्याय खुले राहावेत, अशी या गटाची इच्छा असून त्यात पारंपरिक युद्धाचाही समावेश आहे.
एका मेजर जनरलने यासंदर्भात आपले मत मांडले असून त्यानुसार, भारताशी वाटाघाटीही करून बघाव्यात, असे म्हटले आहे; पण वाटाघाटी केल्या तरीही इतर सर्व पर्याय खुले असावेत, अशी इच्छा व्यक्त केली असून त्यात पारंपरिक युद्धाचाही समावेश आहे. डेमॉक्रसी : मिलिटरी पॉलिटिक्स इन पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक अकील शाह यांनी ही भूमिका मांडली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या भारतासंदर्भातील भूमिकेचा ऐतिहासिक अभ्यास असे या पुस्तकाचे वर्णन हॉवर्ड विद्यापीठाने केले आहे. हे पुस्तक अमेरिकेत प्रसिद्ध झाले आहे. ज्या लष्करी अधिकार्याने हे मत व्यक्त केले आहे, त्याचे नाव अकील शाहने प्रसिद्ध केलेले नाही. अकील शाह हे प्रिन्स्टन विद्यापीठात पॉलिटिक्सचे प्राध्यापक आहेत. त्यांच्यामते पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेतील हा बदल हेतूपूर्वक असून, आपल्या देशाची घडी नीट बसविण्यासाठी वेळ मिळावा म्हणून हे वाटाघाटींचे नाटक आहे. पाकिस्तानला दहशतवाद्यांकडून असणारे धोके व कमकुवतपणा यामुळे लष्कराने आपली भूमिका बदलली असावी, त्याचबरोबर अनेक अधिकार्यांच्या मते पाकिस्तानचे काश्मीर धोरण फसल्यात जमा आहे. काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार सार्वमत घ्यावे अशी पाकिस्तानची मागणी होती; पण या धोरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही, असे लक्षात आले आहे. त्यामुळे पाकला काश्मीर धोरणही बदलण्याची इच्छा आहे. त्यामुळेच आता वाटाघाटींना एक संधी द्यावी, अशी एका गटाची इच्छा आहे. काश्मीरबाबत मूळ भूमिका न बदलता हे धोरण राबवता येईल, असे अपेक्षित आहे. हे पुस्तक लिहिताना अकील शाह यांनी चार लष्करप्रमुख व तीन आयएसआय प्रमुख यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. वाटाघाटीतूनच काश्मीरबाबत पाकिस्तानला हवे ते मिळवता येईल, त्याचबरोबर पाकिस्तानची घसरलेली अंतर्गत स्थितीही सावरता येईल, असा लष्कराचा होरा आहे. शत्रूराष्ट्रात छुपे युद्ध चालवणे, दहशतवाद्यांना घुसविणे हे उपायही फारसे लाभदायक ठरत नसल्याची कबुली एका वरिष्ठ अधिकार्याने दिली असल्याचे या पुस्तकात म्हटले आहे. अण्वस्त्र सामर्थ्य व राजकीय वाटाघाटीद्वारे आपल्याला हवे ते मिळवता येईल, असे या अधिकार्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानात दहशतवादी गटांचे साम्राज्य असून, त्यांच्याकडील घातक शस्त्रास्त्रे व त्यांच्या हातात अण्वस्त्रे पडण्याचा धोका यामुळे पाकिस्तानची गणना लवकरच अयशस्वी अण्वस्त्रधारी देश म्हणून होईल, असे या पुस्तकात म्हटले आहे.
-----------
काश्मीरसंदर्भात शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रतीबद्ध - नवाज शरीफ
इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी नेहमीप्रमाणे शांततेचा राग आळवला असून, काश्मीरसंदर्भातही भारताशी चर्चा करुन शांततेने तोडगा काढण्यास प्रतिबद्ध असल्याचे म्हटले आहे. भारताशी जे वाद आहेत, त्या सर्वावर आम्ही शांततेने चर्चा करु व काश्मीरसह सर्व मुद्यावर तोडगा काढू असे नवाज शरीफ यांनी सांगितले. पाकिस्तानात राजदूतांच्या परिषदेत ते बोलत होते.