इस्लामाबाद - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रांनी बुधवारी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. त्यानंतर आता पाकिस्ताननेही त्याचावर मोठी कारवाई करताना त्याच्यावर बंदी घातली आहे. भारतानेदहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढ्याला बुधवारी मोठे यश मिळाले. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या तसेच भारतामध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आज आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांमध्ये चीननं वारंवार खोडा घातला होता. त्यामुळे मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात अडथळे येत होते. मात्र अजहर प्रकरणात अडथळा आणला जाणार नसल्याचे संकेत चीनकडून नुकतेच देण्यात आले होते. त्यामुळे अखेर आज अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले. पाकिस्तानात लपून बसलेल्या अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. काश्मिरी तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण देणाऱ्या मसूद अझहरला अटक करण्यात आली होती. पुढे 1999 च्या कंदाहार विमान अपहरण नाट्यानंतर मसूद अझहरला भारत सरकारने मुक्त केले होते. त्यानंतर मसूद अझहरने पाकिस्तानात लपून भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले होते.
मसूद अझहरला अजून एक दणका, यूनोच्या कारावाईनंतर पाकिस्ताननेही घातली बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 20:13 IST