लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरहून आखाती देशांकडे जाणाऱ्या व तिथून काश्मीरला येणाऱ्या विमानांना आपल्या हवाई हद्दीचा वापर करू देण्यास पाकिस्तानने नकार दिला आहे. त्यामुळे या विमानांना वेगळ्या मार्गाने जावे लागत असून, त्यामुळे प्रवासाचा वेळही वाढला आहे. पाकिस्तानच्या या कृतीचा भारताने निषेध केला आहे.
गोफर्स्ट या कंपनीने श्रीनगर ते शारजाह या मार्गावर विमानसेवा सुरू केली. या विमानाची आठवड्यातून चार वेळा उड्डाणे होतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विमानसेवेचे २३ ऑक्टोबर रोजी उद्घाटन केले होते. त्यानंतर पहिले काही दिवस गोफर्स्टच्या विमानांना पाकिस्तानने आपली हवाई हद्द वापरू दिली. त्यानंतर नकारघंटा वाजविण्यास सुरूवात केली. त्यामुळे काश्मीरहून आखाती देशांकडे जाणाऱ्या विमानांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.
श्रीनगरहून पाकिस्तानच्या हवाई मार्गे आखाती देशांना जाण्यासाठी सुमारे ३ तास ४० मिनिटे लागतात. पण आता ही हवाई हद्द वापरता येत नसल्याने या प्रवासाच्या वेळेत आणखी ४० ते ५० मिनिटांची वाढ झाली. श्रीनगर ते शारजाह या मार्गावर उड्डाण करणाऱ्या भारतीय विमानांना पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केल्याबद्दल त्या देशाला भारताने पत्र लिहिले आहे. पण त्यावर पाकिस्तानने अद्याप काहीही प्रतिसाद दिलेला नाही.
याआधीही झाली होती हवाई हद्दबंदी २०१९ साली भारतीय हवाई दलाने बालाकोट हल्ला येथे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी हवाई हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारताला १३८ दिवसांसाठी बंद केली होती. त्यावेळीही भारताने या प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेकडे (आयीसीएओ) आवाज उठविला होता.