Pakistan vs Delhi, Air Pollution: मुलतान, दक्षिण पंजाब, पाकिस्तानमध्ये AQI पातळी २,५५३ वर पोहोचली. अशा परिस्थितीत अत्यंत निकृष्ट दर्जाच्या हवेमुळे मुलतान हे जगातील सर्वात प्रदूषित शहर बनले आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी हे अत्यंत धोकादायक आहे. हवेतील प्रदूषणाची पातळी वाढल्यामुळे पंजाबमधील सार्वजनिक ठिकाणी लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. लोकांना उद्याने, संग्रहालये, प्राणीसंग्रहालय, क्रीडांगणे इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुलांच्या आरोग्याचा विचार करून शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत.
दिल्लीपेक्षा ६ पट दुषित हवा
भारतातील राजधानी दिल्लीची हवाही प्रदूषित झाली आहे. दिल्लीतील १२ ठिकाणांची स्थिती इतकी वाईट आहे की तेथील AQI पातळी 400 वर पोहोचली आहे. विषारी हवेपासून बचाव करण्यासाठी लोक मास्कचा वापर करत आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, श्वासोच्छवासाच्या आजारांनी त्रस्त असलेल्यांनी गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडावे. रूग्णालयांमध्ये श्वसनाच्या आजाराने ग्रस्त रूग्णांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. राजधानीत अनेक ठिकाणी धुक्याचा परिणाम दिसून येत आहे. पण पाकिस्तानातील परिस्थितीत दिल्लीपेक्षाही वाईट आहे. पाकिस्तानच्या बहुतांश भागात प्रदूषणाने कहर केला आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सार्वजनिक ठिकाणी जाण्यावर बंदी घालण्यात आली असताना धुक्यामुळे लाहोरमधील लोकांना बाहेर पडताना अंधुक किंवा धुसर हवा दिसत आहे. प्रदूषणात एवढी वाढ हे मुलतान आणि इतर शहरांसाठी मोठे आरोग्य संकट आहे. वाढत्या प्रदूषणामुळे येथे राहणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. धुक्यामुळे पाकिस्तानात राहणाऱ्या लोकांचा श्वास कोंडला जात आहे. बाहेर जाताना दृश्यमानता देखील लक्षणीयरित्या कमी झाली आहे.