ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. 28 - पाकिस्तानला एफ16 लढाऊ विमाने विकण्याच्या ओबामा प्रशासनाच्या निर्णयावरुन अमेरिकेतील खासदारांनी चिंता व्यक्त केली आहे. या लढाऊ विनामांचा वापर दहशतवादाशी लढण्याऐवजी भारताविरोधात केला जाऊ शकतो अशी चिंतादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. ओबामा प्रशासनाने आपल्या निर्णयावर फेरविचार करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
माझ्यासोबत काँग्रेसचे अनेक सदस्य ही विक्री करण्यामागच्या निर्णय आणि वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. भारत-पाकिस्तानमधील संबंध अजूनही ताणलेले आहेत. पाकिस्तानने या एफ 16 विमानाचा वापर दहशतवादाशी लढण्याचा दावा केला आहे. मात्र दहशतवादाशी लढण्याऐवजी भारत किंवा इतर प्रादेशिक शक्तींविरोधात या विमानांचा वापर केला जाऊ शकतो अशी भीती अमेरिकन काँग्रेसचे सदस्य मॅट सॅलमन यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानला देण्यात येणारी लष्कराची मदत आणि एफ16 विमानं यांच्या खर्चाचादेखील अंदाज घेणं गरजेचं आहे. तसंच यांचा वापर पाकिस्तानी हवाई दल दहशतवाद्यांविरोधात प्रभावीपणे करते की नाही हे पाहणंदेखील गरजेचं आहे असं मत अमेरिकन काँग्रेसचे सदस्य ब्रॅड शर्मन यांनी मांडलं आहे. पाकिस्तानला आपल्याला अत्याधुनिक शस्त्रास्र पुरवली पाहिजेत मात्र त्याचा वापर दहशतवाद्यांशी लढण्यासाठी व्हावा, भारताविरोधात युद्धाची तयारी करण्यासाठी नाही असंदेखील ब्रॅड शर्मन यांनी म्हटलं आहे.
अमेरिकन सिनेटने सध्या ओबामा प्रशासनाच्या पाकिस्तानला आठ एफ 16 लढाऊ विमाने विकण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. 700 मिलियन डॉलरच्या किंमतीत ही विमाने विकण्यात येणार होती.
ओबामा प्रशासनाचं प्रतिनिधित्व करणा-या रिचर्ड ओल्सन यांच्याकडून मॅट सॅलमन यांना यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. ही विमाने विकणं अमेरिकेच्या हिताचं कसं आहे ? असा सवालही त्यांनी विचारला. 9/11 दहशतवाही हल्ल्यानंतर दहशतवादाशी लढण्यासाठी पाकिस्तानला आर्थिक मदत पुरवूनदेखील दहशतवाही कारवाया सुरु असल्याचा आरोप मॅट सॅलमन यांनी केला आहे.