इस्लामाबाद : पाकिस्तानातील (Pakistan) काही शहरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठा हिंसाचार (Violence) सुरु झाला आहे. यामुळे फ्रान्सने त्यांच्या नागरिकांना तातडीने पाकिस्तान सोडण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानात राहणाऱ्या त्यांच्या नागरिकांना लगेचच पाकिस्तान सोडण्याचा मेल केला आहे. त्यांना कोणत्याही दुसऱ्या देशात रवाना होण्यास सांगण्यात आले आहे. (The French embassy in Pakistan on Thursday advised all French nationals and companies to temporarily leave the country, after violent anti-France protests paralysed large parts of the country this week.)
गेल्या काही महिन्यांपासून फ्रान्सच्या राजदूताला पाकिस्तानमधून परत पाठवावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. यामध्ये अनेक कार्यकर्ते ठार झाले आहेत. तसेच या हिंसाचारामुळे पाकिस्तानमध्ये गेलेले 800 भारतीय शीख अडकले आहेत. पोलीस आणि कट्टरतावादी पक्ष असलेल्या तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानच्या (टीएलपी) कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला आहे. मंगळवारपासून ही हिंसा भडकली आहे. तहरीक-ए-लब्बैकचा नेता साद रिजवी याला पोलिसांनी अटक केली आहे. संघटनेवरही बंदी घातली आहे. तरीही हजारो लोक रिझवीला सोडण्यासाठी रस्त्यावर आले आहेत.
फ्रान्सच्या राजदुताला पाकिस्तानातून घालविण्यासाठी या आंदोलकांनी इम्रान खान सरकारला २० एप्रिलपर्यंतची वेळ दिली होती. मात्र, त्या आधीच पोलिसांनी सादला अटक केली. यामुळे त्याचे हजारो समर्थक रस्त्यावर आले आणि हिंसाचाराला सुरुवात झाली. टीएलपीने पोलिसांसोबत झालेल्या संघर्षात 12 कार्यकर्ते ठार झाल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानमधील लाहोरसह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दलाचे जवान तैनात केले आहेत. पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये टीएलपीच्या कार्यकर्त्यांनी रस्ते अडवून ठेवले आहेत. यामुळे 800 भारतीय शीख अडकून राहिले आहेत. सोमवारी (12 एप्रिल) बैसाखी सण साजरा करण्यासाठी 815 शीखांचा गट वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानमध्ये दाखल झाला होता.
कोण आहे साद रिझवीखादिम हुसैन रिझवी यांच्या निधनानंतर साद रिझवी हा तहरीक-ए-लब्बैकचा नेता बनला. रिझवी समर्थक देशात अल्लाची निंदा करण्याविरोधातील कायदा रद्द न करण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत. सरकारने फ्रान्सच्या साहित्यावर बहिष्कार घालावा, त्यांचे साहित्य आणू नये. तसेच रिझवीच्या पक्षासोबत सरकारने केलेल्या करारानुसार फ्रान्सच्या राजदुताला देशातून बाहेर काढावे, यासाठी दबाव वाढविला जात आहे.