नवी दिल्ली - अनेक वर्षापासून भारताची शान असलेल्या कोहिनूर हिऱ्यावर पुन्हा एकदा पाकिस्तानने आपला दावा केला आहे. गुरुवारी पाकिस्तानीचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी ब्रिटनला कोहिनूर हिरा पाकिस्तानला परत करावा अशी मागणी केली आहे. याआधीही भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराण यांनी कोहिनूर हिऱ्यावर दावा केला आहे. 105 कॅरेटचा हा कोहिनूर हिरा गेल्या दिडशेहून अधिक वर्षापासून ब्रिटीश राजेशाही घराण्याकडे आहे.
फवाद चौधरी यांनी जालियनवाला बाग हत्याकांडावरही भाष्य करत बिटीशांनी पाकिस्तान, भारत आणि बांग्लादेशाची माफी मागितली पाहिजे अशीही मागणी केली. जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना इंग्लंडच्या इतिहासातील काळा डाग आहे असंही फवाद यांनी सांगितले.
105 कॅरेट वजनाचा व सुमारे 200 दशलक्ष डॉलर किमतीचा कोहिनूर एकेकाळी जगातील सर्वांत मोठा हिरा मानला जात असे. भारतातून ब्रिटनला नेल्यावर हा हिरा ब्रिटनच्या शाही मुकुटात बसविला गेला. महाराणी व्हिक्टोरिया यांनी राज्याभिषेकाच्या वेळी कोहिनूर हिरा बसविलेला तो राजमुकुट परिधान केला. सध्या हा हिरा लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे.
कोहिनूर हिरा भारतीय लोककथेचा भाग समजला जातो. या हिऱ्यासह अनेक मौल्यवान वस्तू इंग्रज भारतातून मायदेशी घेऊन गेले होते. या वस्तूंसोबतच इतरही अनेक वस्तू भारताबाहेर नेण्यात आल्या. सध्या या वस्तू जगभरातील संग्रहालयांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तूंबद्दलची माहिती मिळवण्यासाठी एका माहिती अधिकार कार्यकर्त्यानं पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे अर्ज केला होता मात्र त्यावरही ठोस उत्तर आलं नाही.
ब्रिटनने केला ठाम विरोधभारत सरकारने कोहिनूर हिरा ब्रिटनकडून परत आणावा ही मागणी फार जुनी आहे. अनेकांनी त्याची सांगड राष्ट्रीय अस्मितेशीही घातली. कोहिनूर हिरा ब्रिटनने भारतावर राज्य करीत असताना येथून लुटून किंवा जबरदस्तीने नेलेला नाही, तर पंजाबच्या तत्कालीन राजाने तो त्यांना भेट दिला आहे. त्यामुळे भारत हा हिरा परत करण्याची मागणी भारत करु शकत नाही त्यामुळे ब्रिटनने तो हिरा परत करण्यास ठाम नकार दिला आहे.