ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १७ - दक्षिण सिंध प्रांतातून 'रॉ' च्या दोन एजंटना अटक केल्याचा दावा पाकिस्तानने शनिवारी केला. 'रॉ' ही भारतीय गुप्तचर संस्था असून, बलूचिस्तान आणि सिंध प्रांतातील दहशतवादी कारवायांमध्ये 'रॉ' चा सहभाग असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.
न्यूज इंटरनॅशनलच्या वृत्तानुसार थट्टा शहरातून 'रॉ' च्या दोन एजंटना अटक केली. सद्दाम हुसैन आणि बाचाल अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मच्छीमार म्हणून वावरणारे हे दोघे रॉ साठी काम करत होते असे दहशतवाद विरोधी विभागाचे अधिकारी नावीद ख्वाजा यांनी सांगितले.
कोणाच्याही लक्षात येऊ नये यासाठी भारताने दोघांना कोड दिले होते असा दावा ख्वाजा यांनी पत्रकारपरिषदेत केला. संवेदनशील ठिकाणांचे फोटो दोघांकडून जप्त केल्याचे ख्वाजा यांनी सांगितले. चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर प्रकल्पात घातपात घडवण्याची त्यांची योजना होती असा दावा ख्वाजा यांनी केला.