ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. २५ - संयुक्त राष्ट्राच्या परीषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झाले असतानाच पाकिस्तानने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्राकडे भारताविरोधात तक्रार केली आहे. सीमा रेषेवर भिंत बांधण्याच्या भारताच्या योजनेवर पाकचा आक्षेप असून भिंत बांधून भारत विविध आंतरराष्ट्रीय समितींनी दिलेल्या प्रस्तावाचे उल्लंघन करत असल्याचा दावा पाकने केला आहे.
जम्मू काश्मीरमधील भारत - पाक सीमा रेषेवर भारताने १९७ किलोमीटर लांब, १० मीटर उंच व १३५ फुट रुंद इमारत बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भारताच्या या योजनेवर पाकने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात पाकिस्तानचे राजदूत मलिहा लोधी यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे दोन वेळा तक्रार नोंदवल्याचे समोर आले आहे. भारताने यावर अद्याप प्रतिक्रिया दिली नसून योग्य वेळ आल्यावर पाकला उत्तर देऊ असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी सांगितले. दरम्यान, पाकच्या या कृतीमुळे दोन्ही देशांमध्ये संबंधांमध्ये पुन्हा एकदा मीठाचा खडा पडला आहे. संयुक्त राष्ट्राच्या परिषदेसाठी मोदी व पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे सध्या न्यूयॉर्कमध्ये असून दोघेही एकाच हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट होईल अशी चर्चा होती. मात्र आता पाकने तक्रार केल्याने दोन्ही नेत्यांमध्ये भेट होण्याची शक्यता मावळल्याचे जाणकार सांगतात.