ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २७ - मुंबईत २००८ मध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी देण्याची मागणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. मुंबईत झालेल्या २६/११ हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी मिळावेत म्हणून पाक सरकारने याचिका दाखल केली होती.
पोलीसांच्या तपास यंत्रणा साध्या प्रतिवादासाठीही उपस्थित न राहिल्यामुळे ही मागणी फेटाळण्यात येत असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. याआधीही एकदा याच कारणासाठी कोर्टाने याचिका फेटाळली होती. झाकी उर रहमान लखवीच्या आवाजाचे नमुने पाकिस्तानच्या फेडरल इनवेस्टिगेशन एजन्सीने मागितले होते. तसेच इतर संशयितांच्या आवाजाचे नमुने देण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे.
यापुर्वी २६/११ हल्ल्यातील बोटीचे परीक्षण करण्यास पाक कोर्टाने नकार दिला होता. या हल्ल्यात लष्कर -ए-तोयबाच्या दहा दहशतवाद्यांनी ‘अल-फौज’ बोटीचा वापर करीत मुंबईत प्रवेश केला होता. हा हल्ला झाल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानातून दहशतवाद्यांशी फोनवर झालेले संभाषण टेप करून त्याचे नमुने पाकिस्तानला दिले होते. लखवी व अन्य सहा संशयितांच्याविरोधात याचा पुरावा म्हणून वापर करण्याचे भारतातर्फे सांगण्यात आले होते.
परंतु पाकिस्तानच्या न्यायालयात साधं उपस्थितही राहण्याचं सौजन्य पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीने दुस-यांदा दाखवलं नाही. यातून पाकिस्तानच्या सरकारी यंत्रणा मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना शासन करण्याच्या बाबतीत भारताशी सहकार्य करत नसल्याचेच दिसून येत आहे.