इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अडचणी वाढतच आहेत. नवाज शरीफ यांना फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट प्रकरणी पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने निर्दोष केले. मात्र, अल- अजीजिया प्रकरणी त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच, त्यांना न्यायालयाने 25 मिलीयन डॉलर दंड सुद्धा ठोठावला आहे.
एव्हनफिल्ड प्रॉपर्टीज, फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट आणि अल-जजीजिया प्रकरण 2017 मध्ये उघडकीस आले होते. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाची सुनावणी सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी न्यायालयात अनेकदा अपील करण्यात आले. मात्र, आज न्यायालयात फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट आणि अल- अजीजीया प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट प्रकरणी नवाज शरीफ यांना निर्दोष केले. मात्र, अल- अजीजिया प्रकरणी त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच, 25 मिलीयन डॉलर दंड सुद्धा न्यायालयाने ठोठावला आहे. न्यायाधीश मोहम्मद अरशद मलिक यांनी याप्रकरणावर निर्णय दिला.
दरम्यान, नवाज शरीफ आधीपासून भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाज शरीफ यांचे पतंप्रधान पद बरखास्त केले होते. या निर्णयावेळी सर्वोच्च न्यायालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला होता. त्यावेळी समर्थक आणि पोलीस यांच्यात मोठी धुमचक्री झाली होती. समर्थकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या होत्या.