Babar Azam conferred with Sitara-e-Imtiaz । नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमच्या नावावर आणखी एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. बाबर आझमला पाकिस्तानातील प्रतिष्ठित 'सितारा-ए-इम्तियाज' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सितारा-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. वयाच्या 28 व्या वर्षी बाबर आझमला हा मान मिळाला आहे. तसेच हा पुरस्कार मिळवणारा तो सर्वात तरुण पाकिस्तानी क्रिकेटर ठरला आहे.
बाबर आझमने पुरस्कार मिळाल्यानंतर ट्विटरवर याचे फोटो शेअर केले आहेत. "माझ्या आई-वडिलांच्या उपस्थितीत सितारा-ए-इम्तियाज पुरस्काराने सन्मानित होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार माझे आई-वडील, चाहते आणि पाकिस्तानातील नागरिकांना समर्पित आहे", असे बाबरने म्हटले.
बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तानी संघाला जागतिक पातळीवर उभारी मिळाली आहे. अलीकडेच बाबर आझमने क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी 2022 चा ICC पुरुष क्रिकेटपटू आणि ICC वन डे प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार पटकावला. तसेच त्याला 2022 ICC वन डे टीम ऑफ द इयरचा कर्णधार बनवण्यात आले होते. बाबरच्या आधी मिस्बाह-उल-हक, युनूस खान आणि शाहिद आफ्रिदी यांना क्रिकेटमधील अतुलनीय योगदानासाठी सितारा-ए-इम्तियाज या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"