पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमधला एक मोठा व्यापारी मार्ग तालिबाननं बंद केला असून, दोन्ही बाजूंनी मालाने भरलेले ट्रक अडकून पडले आहेत. पाकिस्तान आपल्या लोकांना उपचार आणि प्रवासासाठी त्यांच्या ठिकाणी जाऊ देत नाही आणि प्रवासी कागदपत्रांची मागणी करत असल्याचा दावा तालिबाननं केला आहे. या वादानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे.
एपी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार तालिबाननं रविवारी तोरखाम बॉर्डर क्रॉसिंग बंद केले. तालिबानचं म्हणणं आहे की पाकिस्तान अफगाणिस्तानातील आजारी लोकांना उपचारासाठी त्यांच्या देशात जाऊ देत नाही. त्यासाठी पाकिस्तानकडून प्रवासाशी संबंधित सर्व कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे. यामुळे तालिबाननं दोन्ही देशांमधला मुख्य व्यापारी मार्ग बंद केला, त्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या व्यापाऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.
सोमवारी तालिबान आणि पाकिस्तानी सुरक्षारक्षकांमध्ये जोरदार गोळीबार झाला. मात्र, गोळीबारात किती नुकसान झालंय, याबाबत दोन्ही बाजूंकडून माहिती देण्यात आलेली नाही.
सामान होतंय खराबदोन्ही बाजूंनी माल वाहून नेणारे ६ हजार ट्रक रविवारपासून अडकले असल्याची माहिती पाकिस्तान-अफगाणिस्तान जॉइंट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे संचालक झियाउल हक सरहदी यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला दिली. बहुतेक ट्रक फळे आणि भाज्यांनी भरलेले असतात, जे आता खराब होत आहेत. वैध प्रवासी कागदपत्रे असलेले शेकडो पाकिस्तानी देखील तोरखामजवळ क्रॉसिंग पुन्हा उघडण्याची वाट पाहत आहेत. यामुळे दोन्ही बाजूंच्या व्यापाऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
अफगाणिस्तान पाकिस्तानवर अवलंबूनअफगाणिस्तान आपल्या बहुतांश गरजांसाठी पाकिस्तानच्या मालावर अवलंबून आहे. अफगाणिस्तानमार्गे मध्य आशियात माल पोहोचवण्यासाठी पाकिस्तानही या क्रॉसिंगचा वापर करतो, मात्र हे क्रॉसिंग बंद झाल्यामुळे सर्व व्यापार ठप्प झाला आहे. काही ट्रक इतर, लहान सीमा ओलांडून पाठवले जात आहेत, परंतु व्यापारी त्या भागात जाणाऱ्या ट्रकच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित आहेतस असंही सरहदी यांनी सांगितलं.