पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. देशाची स्थिती इतकी बिघडली आहे की तो आता दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. महागाई एवढी वाढली आहे की, देशातील जनता अन्न-पाण्यासाठीही दुसऱ्यांवर अवलंबून आहे. दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “पाकिस्तान दिवाळखोर झाला आहे. आपण दिवाळखोर देशाचे रहिवासी आहोत. पाकिस्तान डिफॉल्ट करत नाही, तर यापूर्वीही झाला आहे,” असे ते म्हणाले.
पीएमएल-एनचे नेते आणि संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दावा केला की, “पाकिस्तान डिफॉल्ट करत नाही, तर आधीच डिफॉल्ट झाला आहे आणि आपण एका दिवाळखोर देशात राहत आहोत.” वास्तविक, ख्वाजा आसिफ यांनी सियालकोटमधील एका खासगी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना हे वक्तव्य केले. आपल्या भाषणादरम्यान ख्वाजा आसिफ यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर निशाणा साधला आणि दहशतवादाला पाकिस्तानात परत येऊ दिल्याचा आरोप केला.
इम्रान खान यांनी असा खेळ केला की, आता दहशतवाद हे आपचे नशीब बनले आहे. देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले की, आपण दिवाळखोर देशाचे रहिवासी आहोत, असेही त्यांनी नमूद केले. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. “तुम्ही ऐकले असेल की देश डिफॉल्ट किंवा दिवाळखोर होणार आहे, मंदी येईल, परंतु ते आधीच झाले आहे. आपल्या सर्व समस्यांचे समाधान देशात आहे, परंतु आम्ही यासाठी आयएमएफकडे पाहत आहोत,” असे ते व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतायत.